जळगाव : पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांची सोमवारी जळगाव येथे बदली झाली होती. त्या मंगळवारी सायंकाळी उशिराने जळगावला अ वर्ग नगरपालिका संजय गांधी योजनेच्या तहसीलदार म्हणून रुजू झाल्या आहेत. या विभागाचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी त्यांच्याकडे पदभार सोपवला.
गंभीर स्वरूपाची अनियमितता आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या ज्योती देवरे यांची पारनेरहून जळगावला बदली करण्यात आली. त्यांनी राजकीय मंडळी आणि अधिकारी यांच्याविषयी केलेल्या विधानाची क्लिप व्हायरल होऊन वाद निर्माण झाला होता. बदलीचे आदेश मिळाल्यानंतर लगेच देवरे या जळगावला रुजू झाल्या आहेत.
जळगाव तहसीलदारपदाचे काय?
अ वर्ग नगरपालिका संजय गांधी योजनेचे तहसीलदार म्हणून नामदेव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, वैशाली हिंगे यांची बदली करण्यात आल्यानंतर जळगाव तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार नामदेव पाटील यांच्याकडे देण्यात आला. सोमवारी निघालेल्या आदेशानुसार नामदेव पाटील यांनी मूळ पद संजय गांधी योजनेच्या तहसीलदार पदाचा कार्यभार ज्योती देवरे यांना दिला आहे. त्यामुळे आता जळगाव तहसीलदारपद आणि नशिराबाद प्रशासक या दोन पदांचा पदभार कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.