संरक्षणक भितींच्या कामे वेगाने
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे शिव कॉलनी उड्डाण पुलावजळ रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत उभारण्यात येत आहे. दिवस-रात्र या ठिकाणी काम सुरू आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला २५ ते ३० फुटांपर्यंत संरक्षण भिंत उभारण्यात येत आहे. एका बाजू्च्या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे लवकरच तहसील कार्यालयाजवळ संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात येणार आहे.
रिक्षाचालकाच्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची गैरसोय
जळगाव : नेहरू चौकाकडून कोर्ट चौकाकडे येताना रस्त्यावरच रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे, रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे पादचाऱ्यांसह रेल्वे स्टेशनकडून येणाऱ्या वाहनधारकांनाही नेहरू चौकाच्या वळणावर वाहन काढतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे चौकात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील रिक्षाचालकांचे होणारे अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.
अहमदाबादसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी
जळगाव : जळगाव आगारातून सुरत, बडोदा, सेल्वासा, इंदौर या परराज्यातील मार्गावर बससेवा सुरू असल्यामुळे, प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. मात्र, अहमदाबाद मार्गावर बस नसल्यामुळे, प्रवाशांना पुढे सुरतहून दुसऱ्या वाहनाने अहमदाबादला जावे लागत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, एसटी प्रशासनाने अहमदाबाद मार्गावरही बस सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांमधुन करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी
जळगाव : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषद मधील रिक्त जागांची भरती दोन वर्षांपासून झालेली नाही. ही भरती येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे कक्ष अधिकारी वाय.डी.मराठे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी संदीप देवरे, शिवशंकर महाजन, राजेंद्र कोळी, रमेश पाटील, अनंता कराळे, गणेश सुरवाडे, लक्ष्मण बिऱ्हाडे, रवींद्र पाटील, सतीश परदेशी,भगवान पाटील, प्रमोद शेळके, प्रकाश कोळी, अतुल बऱ्हाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तेली समाजातर्फे परिचय मेळाव्याचे आयोजन
जळगाव : श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाच्या वतीने २१ नोव्हेंबर रोजी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समाजातील इच्छुकांनी ३० सप्टेंबरपर्यंत शनीपेठेतील मंडळाच्या कार्यालयात परिचय अर्ज जमा करावे, असे आवाहन मंडळाचेे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांनी केले आहे.