भोजे गावात दोन महिन्यापासून नळाचे पाणी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:41 IST2018-04-28T22:41:14+5:302018-04-28T22:41:14+5:30
पाण्याअभावी ग्रामस्थांवर स्थलांतराची नामुष्की

भोजे गावात दोन महिन्यापासून नळाचे पाणी गायब
शामकांत सराफ
पाचोरा, दि.२८ : तालुक्यातील भोजे येथे तीव्र पाणीटंचाई आहे. दोन महिन्यांपासून नळांना थेंब भरदेखील पाणी न आल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरु आहे. शासनाच्या टंचाई परिपत्रकाचा बळी ठरलेले भोजे येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. गावातील स्त्री, पुरुष, अबालवृद्ध हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत आहे.
भोजे गावची लोकसंख्या ३ हजारावर आहे. या गावात ४१८ नळ कनेक्शन आहेत. गावास सन १९८८ मध्ये पाणीपुरवठा योजना सार्वेपिंप्री धरणावरून ७ किमी अंतरावरून सुरू झाली. त्यानंतर स्वजलधारा योजना सन २००५/०६ मध्ये २५ लाख निधी खर्च करीत राजुरी वणेगाव धरणावरून घेण्यात आली. २०१३/१४ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजना ५० लाख खर्च करून पूर्ण केली. यात पाईपलाईन २ पाण्याच्या टाक्या, एक बसकी टाकी उभारून पाणी पुरवठ्यावर खर्च करण्यात आला. मात्र खर्च केल्यानंतरही निसर्गाच्या अवकृपेने भोजे शिवारातही पाणी नाही व राजुरी-वाणेगाव धरणं कोरडे ठाक आहे. त्यातच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीचा जलसाठा कमी झाला आहे.
पाणी टंचाईची ही परिस्थिती तीन महिन्यांपूर्वी सुरु झाली होती. ग्रामपंचायतीने ११ जानेवारी २०१८ रोजी 'तात्पुरती पाणी पुरवठा योजना ' म्हणून ७ किमी अंतरावरील सार्वेेपिंप्री धरणावरून पाईप लाईन टाकून पाणी आणण्याचा टंचाई प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पाचोरा पंचायत समितीमार्फत ग्रामीण पाणी पुरवठा खात्याकडे दाखल केला. मात्र संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष आणि दप्तर दिरंगाईने प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यास तब्बल ३ महिने लागले. ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पोहचला. मात्र ३१ मार्च अखेरपर्यंत जे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे येतील तेच प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार त्यांना असल्याचे परिपत्रकात नमूद आहे. १४ फेब्रुवारी २०१८ चे हे परिपत्रक पाणीटंचाईला अडथळा ठरत आहे. भोजे गावाचे तत्कालिन सरपंच दीपाली यशवंत पवार यांनी टंचाई पूर्वीच कार्यवाही केली. विद्यमान सरपंच निर्मला राजेंद्र हिवाळे यांनी सतत पाठपुरावा करूनही अपयश आले .