शेजाऱ्याकडून वीज घेतली, तर होऊ शकते दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:18+5:302021-09-04T04:21:18+5:30
जळगाव : थकबाकी किंवा वीज चोरी करताना सापडल्यास महावितरणतर्फे संबंधित ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर, काही नागरिक हे ...

शेजाऱ्याकडून वीज घेतली, तर होऊ शकते दंडात्मक कारवाई
जळगाव : थकबाकी किंवा वीज चोरी करताना सापडल्यास महावितरणतर्फे संबंधित ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर, काही नागरिक हे शेजारच्या घरातून अथवा जागेतून वीज पुरवठा घेतात. मात्र, अशा प्रकारे वीज पुरवठा घेणे हे विद्युत कायद्यानुसार बेकायदेशीर असून अशा ग्राहकांवर महावितरणतर्फे देणाऱ्या आणि घेणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यात वीज देणाऱ्याचाही वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.
वीज पुरवठा घेणे म्हणजे भारतीय विद्युत कायदा-२००३ मधील कलम १२६ अन्वये असे कृत्य अनधिकृत वीज पुरवठा या वर्गवारीत येते. यामध्ये दुसऱ्याच्या घरातून व जागेतून वीज पुरवठा घेणाऱ्याचा आणि ज्याच्याकडून घेतला आहे, त्याचा वीज पुरवठा खंडित केला जातो. तसेच ज्याच्याकडून वीज पुरवठा घेतला आहे, त्या ग्राहकाला अंदाजित बिल देऊन, यापुढे असा प्रकार केला जाणार नाही, याबाबत हमी घेतली जाते. तसेच एका वर्गवारीसाठी वीज पुरवठा घेऊन, त्याचा वापर इतर वर्गवारीसाठी करणे, हेदेखील कलम १२६ अन्वये बेकायदेशीर आहे. यामध्ये घरगुती वापरासाठी वीजपुरवठा घेऊन, त्याचा व्यावसायिक व औद्योगिक कारणासाठी वापर करण्याचा समावेश होतो. त्यामुळे ग्राहकांनी दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी शेजारील व्यक्तीला वीज पुरवठा न देण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
इन्फो :
चोरी कळवा, दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा
- विजेची चोरी करण्यासह शेजारील नागरिकांना वीज देणेही बेकायदेशीर आहे, अशा प्रकारे जे नागरिक बेकायदेशीर कामे करणाऱ्यांची नावे, संबंधित भागातील नागरिकांनी महावितरणकडे कळविली, तर महावितरणतर्फे माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाते. तसेच संबंधित ग्राहकांवर जी दंडात्मक कारवाई होईल, त्या कारवाईतील १० टक्के रक्कम माहिती देणाऱ्या नागरिकाला दिली जाते.
- जे ग्राहक महावितरणने दिलेल्या दंडाच्या रकमेचा भरणा करीत नाहीत. अशा ग्राहकांचा महावितरणतर्फे वीज पुरवठा खंडित केला जातो. महावितरणतर्फे अशा प्रकारचे गैर प्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.
इन्फो :
कायदा काय सांगतो :
विद्युत कायदा २००३ मधील कलम १२६ नुसार शेजारच्या व्यक्तीला वीज देणे हे बेकायदेशीर आहे. तसेच शेजारच्या नागरिकाकडून वीज घेणेदेखील बेकायदेशीर आहे. जर असा कुणी ग्राहक शेजारच्या व्यक्तीला वीज पुरवठा करताना आढळल्यास, महावितरणचे भरारी पथक वीज देणारा नागरिक कधीपासून वीज बिल देत आहे, यावर घरातील किती उपकरणे चालू आहेत, याची पाहणी करून त्यानुसार वीज देणाऱ्या ग्राहकावर दंडात्मक कारवाई करत आहेत. तसेच घेणाऱ्यावरही दिलेल्या नियमानुसार दंड आकारत आहेत.
इन्फो
जळगाव परिमंडळात अनेक ग्राहकांवर कारवाई
महावितरणच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महावितरणतर्फे भरारी पथकाद्वारे जळगाव, धुळे व नंदुरबार या ठिकाणी गेल्या काही महिन्यांत अनेक ग्राहकांवर कारवाया करण्यात आल्या. या ग्राहकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच भरारी पथकाद्वारे कारवाई मोहीम सुरूच असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो
ग्राहकांनी महावितरणकडून अधिकृत वीज पुरवठा घेऊनच वीज वापरावी. तसेच ज्या प्रयोजनासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्या प्रयोजनासाठीच त्याचा वापर करावा.
- कैलास हुमणे, मुख्य अभियंता, महावितरण, जळगाव परिमंडळ