मनपाच्या सुटीचा फायदा घेत हॉकर्सने थाटली दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:04+5:302021-06-21T04:13:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा कर्मचाऱ्यांच्या शासकीय सुटीचा फायदा घेऊन, रविवारी सुभाष चौक, शिवाजी रोड व बळीराम पेठमधील ...

मनपाच्या सुटीचा फायदा घेत हॉकर्सने थाटली दुकाने
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा कर्मचाऱ्यांच्या शासकीय सुटीचा फायदा घेऊन, रविवारी सुभाष चौक, शिवाजी रोड व बळीराम पेठमधील मुख्य रस्त्यांवर हॉकर्सनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली होती. विशेष म्हणजे याठिकाणी विक्रेत्यांसोबतच ग्राहकांनी देखील मोठी गर्दी केली होती.
एकीकडे मनपा व जिल्हा प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नियोजन करत असताना, दुसरीकडे मात्र नागरिक व हॉकर्ससह इतर विक्रेते कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करत दुकाने थाटत आहेत. रविवारी सुभाष चौक भागात सकाळी १० वाजेपासूनच दुकाने थाटण्यात आली होती. याठिकाणी विक्रेत्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा कोणताही नियम पाळण्यात आलेला दिसून आला नाही. अनेक विक्रेत्यांनी मास्क देखील घातलेले नव्हते. हीच परिस्थिती ग्राहकांची देखील होती. अनेक ग्राहक देखील विनामास्कच बाजारात फिरत होते.
मनपा कर्मचारी सुटीवर आहेत, कोरोना नाही
बाजारात रविवारी झालेली गर्दी पाहता, मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणे कोरोनादेखील सुटीवर आहे, अशीच एक प्रकारची भावना नागरिकांची झालेली दिसून आली. तसेच हॉकर्सने देखील मनपा कर्मचाऱ्यांच्या सुटीचा फायदा घेऊन, शनिवारचा आठवडा बाजार जणू रविवारीच भरवून घेतल्याचे चित्र रविवारी शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात झालेल्या गर्दीवरून दिसून आले. तसेच महात्मा फुले मार्केटमध्ये देखील हॉकर्सला व्यवसाय करण्यास बंदी घातली असताना देखील या मार्केटमध्ये देखील हॉकर्सने आपली दुकाने थाटली होती. इतर दिवसांच्या तुलनेत रविवारी मार्केटमधील अनेक दुकाने बंद असतानाही देखील मार्केटमध्ये जास्त गर्दी दिसून आली. यासह ख्वॉजामिया चौक, बजरंग बोगदा परिसर, गणेश कॉलनी चौक भागात देखील विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.