अतिवृष्टीग्रस्त गावांमध्ये रोगराई रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST2021-09-07T04:22:09+5:302021-09-07T04:22:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त गावात रोगराई पसरू नये याकरिता ग्रामविकास, पशुसंवर्धन व आरोग्य ...

अतिवृष्टीग्रस्त गावांमध्ये रोगराई रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही करा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त गावात रोगराई पसरू नये याकरिता ग्रामविकास, पशुसंवर्धन व आरोग्य विभागाने एकमेकांमध्ये समन्वय राखून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी दिले.
चाळीसगाव शहरासह तालुक्यात ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, या वेळी ते बोलत होते.
पंचनाम्यासाठी इतर तालुक्यांतील मनुष्यबळाचा वापर करा
अतिवृष्टीग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात पशुहानी झाली आहे. त्यामुळे या भागात दुर्गधीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता सर्व संबंधित विभागांनी तातडीने पावले उचलून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या. कृषी विभागाने शेतीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावे व यासाठी इतर तालुक्यांतील मनुष्यबळाचा वापर करावा, बेघरांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यांमधील नागरिकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा नगरपालिकेने पुरवाव्यात, आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिबिर घेऊन नागरिकांची तपासणी करावी तसेच लसीकरण शिबिर घ्यावे तर पशुसंवर्धन विभागाने या भागातील जनावरांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यासाठीही लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी दिले.
या बैठकीस आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त श्यामकांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.