बामोशी बाबांची तलवार मिरवणूक उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:41 IST2019-03-23T23:41:15+5:302019-03-23T23:41:33+5:30
भाविकांची मोठी गर्दी

बामोशी बाबांची तलवार मिरवणूक उत्साहात
चाळीसगाव : हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या पीर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांची तलवार मिरवणूक २३ रोजी सायंकाळी ६ वाजता देशमुख वाड्यातील तलवार भवन येथून काढण्यात आली. यंदा तलवार पकडण्याचा मान प्रकाश मधुकर देशमुख यांना तर धुनीचा मान विजय वसंतराव देशमुख यांना मिळाला. या मिरवणुकीत महाराष्ट्रासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हिंदू-मुस्लीम बांधवांच्याहस्ते तलवारीचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रकाश देशमुख यांच्याकडे तलवार तर विजय देशमुख यांच्याकडे धुनी देण्यात आल्यानंतर सवाद्य मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी जितेंद्र देशमुख, प्रदीप देशमुख, प्रदीप रामराव देशमुख, डॉ. नरेश देशमुख, भालचंद्र देशमुख, अरुण देशमुख यांच्यासह देशमुख परिवारातील सदस्य उपस्थित होते. तलवार मिरवणुकीचे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
दरवर्षी येथे संदल व तलवार मिरवणूक काढण्यात येते. अनेक वर्षांची ही परंपरा येथील हिंदू - मुस्लीम समाज बांधव एकोप्याने साजरी करीत आहेत.