जिल्हा परिषद शाळेतील मुलांना स्वेटर व बूट दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 19:19 IST2018-09-06T19:18:58+5:302018-09-06T19:19:27+5:30
मुक्ताईनगर येथे पंचायत समितीतील कर्मचाऱ्याचा उपक्रम

जिल्हा परिषद शाळेतील मुलांना स्वेटर व बूट दान
मुक्ताईनगर, जि.जळगाव : एरवी व घरातील मृत व्यक्तीची वर्शी म्हटली की, वर्शीचा कार्यक्रम करणे, पूजापाठ करणे व जेवणावळी करणे या पलीकडे काहीही कार्य हे केले जात नाही. मात्र वडील हे सेवाभावी वृत्तीचे असल्याने त्यांच्याचप्रमाणे आपणही सेवाधर्म जागवावा या उद्देशाने प्रेरित होऊन मुक्ताईनगर पंचायत समितीतील कर्मचारी नितीन किसन पाटील यांनी आपल्या वडील किसन नामदेव पाटील यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेत बूट व स्वेटरचे वाटप करून एक आदर्श पायंडा समाजासमोर ठेवला आहे.
किसन नामदेव पाटील यांचे गेल्या वर्षी निधन झाले. आज त्यांची वर्शी होती. वर्षीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम व धार्मिक विधी करणे या पलीकडे जाऊन आपण काही तरी आगळे वेगळे करावे असा उद्देश नितीन पाटील यांनी ठरवला व मुक्ताईनगर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनमध्ये जाऊन गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी स्वेटर व त्याचे वाटप केले.
याशिवाय मुक्ताईनगरातील जुन्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये देणगीही नितीन पाटील यांनी दिली.
याप्रसंगी किसन पाटील यांच्या पत्नी पुष्पाबाई पाटील व पूर्ण परिवार तसेच गटशिक्षणाधिकारी व्ही.डी. सरोदे, नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील, नगरसेविका कुंदा पाटील तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते.