क्षय, कुष्ठ रुग्ण शोध मोहिमेत ३३ लाख लोकांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:44 IST2020-12-04T04:44:33+5:302020-12-04T04:44:33+5:30
जळगाव - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व कुष्ठरुग्ण शोध अभियान १ ते १६ डिसेंबर ...

क्षय, कुष्ठ रुग्ण शोध मोहिमेत ३३ लाख लोकांचे सर्वेक्षण
जळगाव - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व कुष्ठरुग्ण शोध अभियान १ ते १६ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील ३३ लाख ३७ हजार २९२ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी एकुण २९७२ पथके व पर्यवेक्षणासाठी ६३० पर्यवेक्षक यांची निवड करण्यात आलेली आहे. दरम्यान, आदिवासी भागात शंभर टक्के तपासणी करण्यात येणार आहे.
या मोहिमेत प्रत्येक दिवशी २० घरे व शहरी भागात २५ घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सणीसाठी येणाऱ्या पथकांना नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राउत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे. आदिवासी भागातील वाडे, वस्त्या, डोंगरभाग, विटभट्या, ऊसतोड मजुर या भागातील जनतेची १०० टक्के तपासणी करण्यात येणार आहे. असे आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ. इरफान तडवी व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ जयवंत मोरे यांनी सांगितले. सर्व शासकीय व निमशासकीय दवाखान्यामध्ये कुष्ठरोग/क्षयरुग्ण उपचार मोफत दिला जातो. तरी शरीरावरील बधीर चट्टे व लालसर चकाकणारी त्वचा व जाड कानाच्या पाळ्या, हातपायावरील सुन्नपणा व बधिरता व शारीरीक विकृती यांची तपासणी करुन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी बी. टी. जमादार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी केले आहे.
नमुने घेणार एक्सरेही काढणार
निवडण्यात आलेली पथके ही घरोघरी जावून खोकल्याच्या रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळा तंतज्ञाकडे पाठवून निदान करणार आहे. यात गरज भासल्यास रुग्णांचे एक्सरेही केले जाणार आहे. दरम्यान, ज्यांच्या अंगावर चट्टे आढळतील त्यांना आरोग्य केंद्रात पाठवून त्यांचेही कृष्ठरोगाची चाचणी करून घेण्यात येणार आहे. यानुसार हे नवीन रुग्ण समोर येऊ शकतात.