सुप्रीम कॉलनीला मिळणार ‘अमृत’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST2021-02-05T06:02:19+5:302021-02-05T06:02:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरवासिय गेल्या अडीच वर्षांपासून अमृत योजनेच्या खोदकामामुळे त्रस्त आहेत. अडीच वर्षांपासून अमृत अंतर्गत सुरु ...

Supreme Colony will get nectar water | सुप्रीम कॉलनीला मिळणार ‘अमृत’चे पाणी

सुप्रीम कॉलनीला मिळणार ‘अमृत’चे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरवासिय गेल्या अडीच वर्षांपासून अमृत योजनेच्या खोदकामामुळे त्रस्त आहेत. अडीच वर्षांपासून अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजना पुर्ण होण्याची वाट जळगावकर पाहत असून, हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येने ग्रस्त असलेल्या सुप्रीम कॉलनीवासियांनी लवकरच अमृत योजनेतंर्गत पाणी उपलब्ध होणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीचा मुहूर्त साधत नागरिकांना थेट अमृत योजनेच्या नळ संयोजनद्वारे पाणी मिळण्याची शक्यता महापौर भारती सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. सुप्रीम कॉलनीवासीयांना सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी सोमवारी या भागात पाहणी करून, अमृत योजनेच्या कामाची पाहणी केली.

सुप्रीम कॉलनीतील नागरिकांना आजवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. सुप्रीम कॉलनीतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी परिसरात अमृत योजनेंतर्गत पाण्याची टाकी आणि यंत्रणा उभारण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. महापौर भारती सोनवणे यांनी वर्षभरात वारंवार आढावा घेत कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. १ जानेवारीला केलेल्या पाहणीत बांधकाम पूर्ण करण्याची २५ जानेवारी ग्वाही दिली असल्याने सोमवारी महापौरांनी पाहणी केली. यावेळी महापौरांसोबत पाणी पुरवठा सभापती अमित काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे, बाबा साळुंखे, योगेश बोरोले यांच्यासह मनपा अधिकारी आणि मक्तेदार प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्य जोडणी लवकरच होणार

अमृत योजनेच्या भूमीगत टाकीत पाणी येण्यासाठी आवश्यक असलेली मुख्य पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. महामार्गाजवळून जात असलेल्या वाघूरच्या पाईपलाईनला सुप्रीम कॉलनीची पाईपलाईन जोडणे बाकी असून लवकरच ते काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मनपा अभियंत्यांनी दिली. जलकुंभावर विद्युत पंप बसविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व बांधकाम आणि प्लास्टर पूर्ण झाले असून मंगळवारपासून पंप बसविण्यास सुरुवात होणार आहे. पंप बसविल्यानंतर विद्युत पुरवठा जोडणी करून त्याची चाचणी घेण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी महापौरांना दिली. तसेच जोडणीचे सर्व काम १५ दिवसात पूर्ण करून देण्याचे आश्वासन देखील मक्तेदाराने दिले आहे.

अनेक वर्षांची समस्या मार्गी लागणार

सुप्रीम कॉलनीत आजवर असलेल्या नळ संयोजनातून कधीही सुरळीत आणि नियमित पाणीपुरवठा झालेला नाही. अमृत योजनेंतर्गत नागरिकांना नळ संयोजनची जोडणी देण्यात येत असून सर्व काम पूर्ण झाल्यानंतर जुनी यंत्रणा बंद करून अमृतच्या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. अमृतच्या पाण्याचा श्रीगणेशा जळगाव शहरात प्रथमच सुप्रीम कॉलनीत होणार आहे. सर्व काम पूर्ण करून १५ फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीचा मुहूर्त साधून श्रीगणेशा होऊ शकतो अशी ग्वाही मनपा अधिकाऱ्यांनी महापौर भारती सोनवणे यांना दिली आहे.

Web Title: Supreme Colony will get nectar water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.