दोन आठवडे आधीच उन्हाळ्याची चाहूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST2021-03-04T04:28:33+5:302021-03-04T04:28:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - गेल्या काही वर्षात जागतिक हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. याचा परिणाम ऋतूंवर ...

दोन आठवडे आधीच उन्हाळ्याची चाहूल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - गेल्या काही वर्षात जागतिक हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. याचा परिणाम ऋतूंवर देखील पहायला मिळत आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात सरासरीत वाढ झाली आहे. तर हिवाळ्यात देखील सरासरी तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच यंदाचा उन्हाळा देखील दोन आठवडे आधीच दाखल झाला आहे. शहराच्या तापमानात वाढ होत असून पारा ३९ अंशावर पोहचला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिकच कडक राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
जिल्ह्यात साधारणपणे मार्च महिन्याचा शेवटच्या आठवड्यात पारा वाढायला सुरुवात होते. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पारा ३९ ते ४० अंशावर पोहचत असतो, मात्र यंदा फेब्रुवारी महिन्याचा शेवटच्या तर मार्च च्या पहिल्या आठवड्यातच पारा ३८ ते ३९ अंशावर पोहचला आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच जळगावकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत.
काय आहे कारण
हवामान बदलाचा परिणाम दिसून येत असून, यंदा बंगाल व अरबी समुद्रात सातत्याने चक्रीवादळ निर्माण झाली. यामुळे जिल्ह्यात डिसेंबर व जानेवारी महिन्यात उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले गेले. त्याचा परिणाम थंडीवर झालेला दिसून आला. तसेच तिन्ही महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान , उत्तरेकडून थंड वारे येत असताना फेब्रुवारी महिन्यात ५ विक्षोभ तयार होत असतात, त्यामुळे मार्च महिन्याचा मध्यापर्यंत तापमान सहसा वाढत नाही. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्यात केवळ २ विक्षोभ तयार झाले. त्यामुळे तापमानात ४ ते ५ अंशाची वाढ झाली असून यंदा मार्च महिन्याचा पहिल्या आठवड्यातच पारा ३९ अंशावर पोहचला आहे.
हिवाळ्यात किमान तापमानात ३ अंशाची वाढ
यंदा हिवाळ्यात देखील तापमानात घट झाली नव्हती. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात किमान तापमानाची सरासरी जिल्ह्यात सहसा १३ ते १४ अंश इतकी असते, मात्र यंदा ही सरासरी १७ अंश पर्यंत वाढली आहे. गेल्यावर्षी ही सरासरी १६ अंश इतकी होती. दोन वर्षात ही सरासरी ३ अंशानी वाढली आहे. सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे भविष्यात जिल्ह्यातील रब्बी हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पुन्हा अवकाळी चे संकट
यंदा तापमानवाढीसह सातत्याने अवकाळी चे संकट देखील वाढले आहे. जिल्ह्यात यंदा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या हिवाळ्यातील चारही महिन्यात अवकाळी पाऊस झाला. त्यात मार्च महिन्यात देखील पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे.समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत असल्याने कमी दाबाचे पट्टे विकसित होऊन हे संकट आता प्रत्येक महिन्यात निर्माण होऊ लागले आहे.
येत्या पाच दिवसाच्या तापमानाचा अंदाज
तारीख कमाल -किमान
३ मार्च - ३८ - १९
४ मार्च - ३९ - १८
५ मार्च - ४० - २०
६ मार्च -३९ - २०
७ मार्च - ३९ - २०
कोट
तापमानात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे हवामानात होत असलेले बदल हेच आहे. जागतिक हवामानात बदल होत आहे. त्याचा परिणाम आपल्याकडील ऋतूंवर देखील होत आहे. भविष्यात हे बदल मोठया वेगाने होतील.
-नीलेश गोऱ्हे, हवामान तज्ञ.