वडगाव लांबे येथे तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 16:45 IST2021-01-16T16:44:37+5:302021-01-16T16:45:34+5:30
नातेवाईकांना मतदानासाठी पाहून एका विवाहित तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी वडगाव लांबे येथे घडली.

वडगाव लांबे येथे तरुणाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहुणबारे, ता. चाळीसगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील २४ वर्षीय विवाहित तरुणाने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील ग्रामपंचायतीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. दुपारी अडीचच्या सुमारास गावातील सचिन डोंगरसिंग घोरपडे (२४) या विवाहित तरुणाने देखील मतदानाचा हक्क बजावला. घरी आल्यानंतर त्याने मतदानासाठी घरी असलेल्या आपल्या आई व मोठ्या वहिनींना मतदानासाठी पाठवले. यावेळी सचिनचे वडील व भाऊ शेतीकामासाठी शेतात गेलेले होते तर पत्नी भावाच्या लग्नासाठी खडके (ता. एरंडोल) येथे माहेरी दोन वर्षांचा मुलगा हर्षल याच्यासोबत गेली होती. त्यामुळे घरी कोणी नसल्याचे पाहून सचिनने दुपारी तीनच्या सुमारास घरात आतून कडी लावली व स्लॅबच्या लोखंडी कडीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
काही वेळानंतर आई, वहिनी आल्यानंतर दरवाजा आतून उघडत नसल्याने गावातील काही तरुणांच्या मदतीने दरवाजा तोडला असता, आत्महत्या केल्याचे लक्षात आले. याबाबत अजयसिंग घोरपडे यांनी मेहुणबारे पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
चिमुरडा झाला पोरका
मृत सचिनचे चार वपूर्वी लग्न झाले असून त्याला दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नीने हंबरडाच फोडला. आई-वडिलांचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले होते. या घटनेमुळे संपूर्ण गाव सुन्न झाले असून त्याचा दोन वर्षांचा मुलगा पोरका झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मृत सचिनवर सायंकाळी सातला गावात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.