आयुष्याच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST2021-01-08T04:47:51+5:302021-01-08T04:47:51+5:30
जळगाव : कौटुंबिक परिस्थिती हलाखीची व दोन वेळच्या जेवणाचे वांधे असताना शिक्षणाचा खर्च पेलणे अवघड जात असल्याचे पाहून खुशबू ...

आयुष्याच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या
जळगाव : कौटुंबिक परिस्थिती हलाखीची व दोन वेळच्या जेवणाचे वांधे असताना शिक्षणाचा खर्च पेलणे अवघड जात असल्याचे पाहून खुशबू गोपाळ चौधरी (२३) या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता भादली, ता. जळगाव येथे घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भादली येथील गोपाळ चौधरी हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वांह भागवतात. पत्नी व मुलगी असा तिघांचाच त्यांचा परिवार होता. एकुलती एक मुलगी खुशबू ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला जळगावात शिक्षण घेत होती. तिला आणखी शिक्षण घेऊन स्वबळावर उभे राहायचे व शिक्षणामुळे लग्नाचेही चांगले स्थळ मिळेल, अशी तिची अपेक्षा होती. मात्र उच्चशिक्षणासाठी मोठा खर्च लागत असल्याने तो पेलला जात नाही, त्यामुळे वडिलांनी तिला पुढचे शिक्षण न करण्याचा सल्ला दिला होता. गेल्या दोन महिन्यांपासूनच घरात याच विषयावर खल सुरू होता. त्यामुळे खुशबू प्रचंड नैराश्यात होती.
आई लग्नात, वडील शेतात
गुरुवारी सकाळी आई गावातच लग्नाला, तर वडरल दुसऱ्याच्या शेतात मजुरीने कामाला गेलेले होते. खुशबू घरी एकटीच होती. दहा वाजता तिने गळफास घेऊन जीवन संपविले. हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आल्यानंतर कुटुंबाला माहिती देण्यात आली. मुलीने गळफास घेतल्याचे पाहून आईने एकच हंबरडा फोडला. खुशबूला तातडीने तिला जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कुरकुरे यांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह दुपारी भादली येथे नेण्यात आला. दरम्यान, आई व वडिलांचा आक्रोश पाहता मृतदेह घेऊन जाणारी शववाहिका गावाच्या बाहेरच काही वेळ थांबविण्यात आली होती. तासाभरानंतर मृतदेह गावात नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. खुशबूच्या मृत्यूमुळे गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे.