विद्यार्थ्यांना घ्यावा लागतो खासगी बसेसचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:13+5:302021-07-28T04:17:13+5:30
पहूर, ता.जामनेर : आठवी ते बारावीच्या प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या असल्या, तरी ग्रामीण भागात बसेस बंदच आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना ...

विद्यार्थ्यांना घ्यावा लागतो खासगी बसेसचा आधार
पहूर, ता.जामनेर : आठवी ते बारावीच्या प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या असल्या, तरी ग्रामीण भागात बसेस बंदच आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना खासगी बसेसचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, मानव विकास मिशनच्या बसेस अद्यापही बंदच आहेत. यामुळे विद्यार्थिनींना येण्या-जाण्यासाठी बसेस बंद असल्याने गैरसोय मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे शैक्षणिक फटका बसत आहे.
दरम्यान, पहूर गावाला लागून २५ ते ३० खेड्यांचा संपर्क आहे. खेड्यापाड्यातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पहूर येथे जास्त आहे, तसेच जामनेर, शेंदुर्णी येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींचे मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रवासाचे केंद्रबिंदू पहूर आहे. विद्यार्थिनींसाठी मानव विकास मिशनअंतर्गत बस शिक्षण घेण्यासाठी मोफत आहे. शैक्षणिक धोरणानुसार आठवी ते बारावीपर्यंत विद्यालय सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी खेड्यापाड्यातून शिक्षण घेण्यासाठी पहूर, जामनेर, शेंदुर्णी येथे जातात, पण मानव विकास मिशनअंतर्गत विद्यार्थिनींसाठी मोफत असलेली बस कोराेनाच्या पार्श्वभूमीवर बंदच आहे. त्यामुळे विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून, खासगी वाहनाने जावे लागत आहे. शासनाने इतर बस सुविधा सुरू केल्या आहे, पण विद्यार्थिनींसाठी असलेली बस बंद ठेवली, पण शैक्षणिक सत्र सुरू केले आहे. यामुळे वेळप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनींना पायपीट करावी लागत असल्याने संतप्त भावना व्यक्त होत. यामुळे बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
अहिल्याबाई होळकर बससेवा सुरू आहे. मात्र, मानव विकास मिशन बससेवा बंद आहे. बस सुरू करण्यासाठी शासन स्तरावरून कोणताही आदेश किंवा सूचना नाही. सुरू करण्याचा निर्णय आमचा नाही. वरिष्ठ स्तरावरील आहे.
- के.ए. धनराळे, आगारप्रमुख, एसटी महामंडळ, जामनेर.