Bhusawal Crime : बहिणीच्या लग्नासाठी झालेले कर्ज फेडता यावे, यासाठी विम्याची रक्कम मिळावी, म्हणून भुसावळातील एकाने ट्रक परस्पर विक्री केला आणि पोलिस ठाण्यात जाऊन ट्रक पळवून नेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी केलेल्या तपासात अखेर सत्य समोर आले. त्यानंतर आरोपीनेही गुन्हा कबूल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सलमान याने १७ जानेवारी रोजी भुसावळ पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार सलमान हा ट्रक घेऊन जामनेरकडून भुसावळकडे येत होता. कुन्हा गावाजवळ रात्री तीन अज्ञातांनी त्याला थांबवले आणि ट्रकमध्ये सामान नसल्याने ट्रक घेऊनच पोबारा केला, अशी फिर्याद दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठेही ट्रक दिसून आला नाही.
दरम्यान, गुन्हा नोंद झाल्यापासून पोलिसांनी घटनास्थळाच्या दोन चार किलोमीटर आसपासचा परिसर धुंडाळून काढला व प्रत्येक सीसीटीव्हीची तपासणी केली. मात्र, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोठेही ट्रक दिसून आला नाही. पोलिसांना फिर्यादी सलमानवरच संशय आला. सलमानला विश्वासात घेतले. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
कर्ज फेडण्यासाठी लावली शक्कल
सलमान याच्यावर बहिणीच्या लग्नासाठी कर्ज झाले होते. ते फेडण्यासाठी त्याने ही शक्कल लढवली. ट्रक विकून टाकला. त्यानंतर चोरी झाल्याचा बनाव केला. त्यातून विम्याची रक्कम मिळेल, अशी अपेक्षा होती. सलमानने जळगाव येथील एका भंगार विक्रेत्याला त्याचा ट्रक एक लाख ७५ हजार रुपयांत विकला. पोलिसांनी त्याची माहिती घेतली आणि कागदपत्रे तपासली. त्यानुसार हा ट्रक खरोखरीच भंगारात विकला गेल्याचे निष्पन्न झाले.