वैद्यकीय संकुलाची अजून प्रतीक्षा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST2021-04-07T04:16:20+5:302021-04-07T04:16:20+5:30
लोकम न्यूज नेटवर्क जळगाव : जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी मिळून ३ वर्षांचा काळ लोटला, पाच अभ्यासक्रमांचा समावेश असलेले, ...

वैद्यकीय संकुलाची अजून प्रतीक्षा...
लोकम न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी मिळून ३ वर्षांचा काळ लोटला, पाच अभ्यासक्रमांचा समावेश असलेले, डॉक्टरांची निवास्थाने, विद्याथ्र्यांची वसतीगृहे असे भले मोठे १३६ एकरात साकारणारे वैद्यकीय संकुलाची अद्यापही प्रतिक्षाच आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी या वैद्यकीय संकुलाचे भूमिपूजन झाले होते. मात्र, कोरोना आला आणि सर्वच ठप्प पडले. कोरोनाने मात्र, जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मर्यादा समोर आणल्या आहेत. वर्षभराच्या कालावधीत विविध पातळ्यांवर सुधारणा झाली, मात्र, पुन्हा कोरोनाने थैमान घालून या उपाययोजना पुरेशा नव्हत्या हे समोर आणले. जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा आढावा...
चिंचोली परिसरात होणाऱ्या वैद्यकीय संकुलासाठी मंत्रालयात नुकतीच एक बैठक पार पडली. यात चंद्रपूर व जळगावच्या या मोठ्या बांधकामांचा आढावा घेण्यात आला. चंद्रपूर महाविद्यालयाचे कामपूर्ण झाले असून ते कधी हस्तांतरीत करावे यावर चर्चा झाली. तर जळगावच्या वैद्यकीय संकुलाबाबत एचटीसील या केंद्रीय कंपनीने नव्याने दर सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती आहे. जीएमसीचे उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे या बैठकीला उपस्थित होते. एकत्रित हालचाली बघता अजूनही बराच कालावधी या वैद्यकीय संकुलासाठी लोटणार आहे. त्यात कोरोनामुळे अनेक मर्यादा आल्याची माहिती समोर येत आहे.
शहरात शासकीय रुग्णालय कुठे?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय वगळता शहरात प्रसुतीसाठी, किंवा नॉन कोविड उपचारासाठी एकही शासकीय मोठे रूग्णालय नाही. न्युमोनियाच्या रुग्णांची आताही फरफट होत असल्यचे चित्र आहे. गेल्या वर्षी हा मुद्दा मोठ्या प्रमाणात प्रकर्षाने समोर आला होता. महानगर पालिकेची सात विविध ठिकाणी रुग्णालये आहेत मात्र, यात केवळ ओपीडी, लसीकणाराची प्रक्रिया पार पाडली जात आहे. येथेही मनुष्यबळाचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहेच. महापलिकेत सद्यस्थितीत एक प्रमुख वैद्यकीय अधिकारी व १० वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. यात डॉक्टर न भेटत असल्याचा मुद्दा वर्षानुवर्षापासून कायम आहे.
जीएमसीत मात्र मोठे बदल
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या वर्षभरात आमुलाग्र बदल झाले आहेत. या ठिकाणी अत्याधुनिक साधनसामुग्रीसह व्हेंटीलेटरची संख्या वाढली आहे. अतिदक्षता विभागांची संख्या वाढविण्यात आली आहे. सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम अंतर्गत सर्वाधिक बेड याच रुग्णालयात उपलब्ध आहेत. ऑक्सिजन टँक कार्यान्वयीत झाला आहे.
ग्रामीण आरोग्य यंत्रणेत बदल मात्र तेही अपूर्ण
जिल्हाभरातील ग्रामीण आरोग्य यंत्रणांमध्येही बऱ्याच अंशी बदल करण्यात आले. कधी नव्हे ते ७० व्हेंटीलेटर्स या यंत्रणेत उपलब्ध झाले आहेत. ऑक्सिजनचे बेड प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाने जसे डोके वर काढले, या उपाययोजना अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. पहिल्या लाटेप्रमाणे ही लाट असेल असे गृहीत धरणे कदाचित धोक्याचे ठरले, असे चित्र आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणेत आताही मनुष्यबळाचा मुद्दा कायम आहे. आरोग्य केंद्रांना एमबीबीएस डॉक्टर अगदी बोटावर मोजण्या इतके आहेत.
मोहाडी रुग्णालय आता सेवेत
मोहाडी शिवारात १०० बेडचे महिला रुग्णालयाचे गेल्या तीन वर्षांपासून काम सुरू होते. हे काम अद्यापही अपूर्णच आहे. मात्र, जितके काम झाले आहे, त्या ठिकाणी सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमअंतर्गत १०० बेडची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही एक मोठी उपलब्धी या काळात म्हणता येईल. मात्र, मध्यंतरी या रुग्णालयाच्या कामाला झालेला विलंब हाही धोक्याचा ठरला आहे.
आयुर्वेद महाविद्यालय झाले अत्याधुनिक
देवकर महाविद्यालयाच्या परिसरात असलेले शासकीय आयुर्वेद महाविद्यायाने मात्र, अन्य रुग्णालयाच्या तुलनेत अत्याधुनिकेची कास धरली आहे. या ठिकाणी सर्व ओपीडी तर आहेच पण विद्याथ्यांच्या अभ्यासक्रमापासून ते उपचारपद्धतीनपर्यंत आधुनिकीकरणावर भर देण्यात आला आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे उपचार उपलब्घ आहेत. यात पंचकर्मा ही उपचार प्रणाली अगदी अल्प दरात या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासह विविध व्याधींवर उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत.
कोरोनामुळे अमुलाग्र बदल
- कोरोनाच्या थैमानात वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे.
- शहरात नियमित सर्वाधिक कोरोना चाचण्या होत आहेत.
- शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इकरा वैद्यकीय महाविद्यालय व आता मोहाडी येथील महिला रुग्णालय अशी तीन मोठी रुग्णालये कोरोना उपचारासाठी सेवेत आहेत. मोहाडी रुग्णालयात दोन अतिदक्षता विभागही राहणार आहेत. टप्या टप्याने या ठिकाणी ८०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचेही नियोजन करण्यात येत आहे.
- पाळधी येथील आरोग्य केंद्रात ही सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम तयार केली आहे.
- जीएमसीचा सर्व परिसर सद्या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आला आहे.
- शासकीय कोरोना निदान प्रयोगशाळेत आता आणखी अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची क्षमता एक हजारांवर पोहोचली आहे. लवकरच दुसरी आरटीपीसीआर मशिनही सुरू होणार आहे.
शासकीय वैद्यकीय यंत्रणा अशी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय : १
ग्रामीण रुग्णालय : १८
उपजिल्हा रुग्णालय : १
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय : १
प्राथमिक आरोग्य केंद्र ७७
आरोग्य उपकेंद्र : ४५०
महापालिकेची रुग्णालये : ७
महिला रुग्णालय : १ काम पूर्णत्वाकडे
वॉर रूमच्या माध्यमातून मिळतेय मदत
जिल्हाधिकारी कार्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण व नातेवाईकांच्या विविध तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी वॉर रूमची स्थापना करण्यात आली असून एका फोनवर रुग्णालयातील बेडची स्थिती नातेवाईकांना यातून माहिती मिळत आहे. यात कुठल्या रुग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत याचीही माहिती प्रशासनाने ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहे. हा एक मोठा आमुलाग्र बदल या काळात झाला आहे.