शिंदी परिसरात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:12+5:302021-07-29T04:16:12+5:30
पीकस्थिती चांगली असली तरी वन्यप्राण्यांच्या त्रासापासून पिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना रात्रीसुद्धा शेतात मुक्काम करावा लागत असल्याचे ...

शिंदी परिसरात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा
पीकस्थिती चांगली असली तरी वन्यप्राण्यांच्या त्रासापासून पिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना रात्रीसुद्धा शेतात मुक्काम करावा लागत असल्याचे दिसून येते. नीलगाय, हरीण, रानडुकरे यांचा शेतीशिवारात मोठ्या प्रमाणावर त्रास असून वनविभागाने यांचा योग्य प्रकारे बंदोबस्त केल्यास शेतकऱ्यांचा त्रास काहीअंशी नक्कीच कमी होईल, असे शेतकरीवर्गातून सांगण्यात आले.
सध्या परिसरात कपाशी हे महत्त्वाचे नगदी पीक असून त्यासोबत ज्वारी, सोयाबीन, मका, तूर, उडीद, मूग ही पिकेसुद्धा शेतीशिवारात चांगल्या प्रकारे दिसून येत आहेत. मात्र, जोरदार पाऊस होत नसल्याने नदी, नाले आजही वाहून निघालेले नाहीत. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही.
जंगलशिवारातील, शेतीशिवारातील तलाव पूर्ण क्षमतेने अजूनही भरलेले नाहीत. त्यामुळे भविष्यातील रब्बी हंगामासाठी विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणे गरजेचे आहे.
गुराढोरांना शेती व जंगलशिवारात हिरवा चारा उपलब्ध झाल्याने चाऱ्याची टंचाई मिटली आहे. शेतीशिवारात मजुरांना कामे उपलब्ध असून कोळपणी, निंदणी, रासायनिक खते देणे, इत्यादी कामे सुरू आहेत. महिलांना दीडशे ते दोनशे रुपये मजुरी मिळत असून पुरुषांना अडीचशे रुपयांपर्यंत दररोज सरासरी मजुरी मिळत असल्याचे सांगण्यात आले.
रासायनिक खते, बी-बियाणे, फवारणी यासाठी लागणारी औषधे यांच्या किमती काही प्रमाणात वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे हंगामाचे काहीसे बजेट कोलमडले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. साधारणपणे दरवर्षी शेतीहंगामासाठी विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकरी कर्जाची उचल करीत असतो आणि हंगाम झाल्यानंतर कर्ज फेडत असतो. मात्र, मागील अनेक वर्षांतील अनुभव पाहता शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी न होता वाढतच असल्याने शेतकरी शेतीपासून काहीसा दुरावत असून अनेक शेतकऱ्यांनी बटाईने जमीन देणे, इतर भागांतून आलेले गोरगरीब कुटुंब यांना जमीन कसायला देणे, अशा पद्धतीने काही शेतकरी शेती करीत असतात. वेळोवेळी गरजेनुसार मजूर उपलब्ध न होणे, मजुरांची टंचाई जाणवणे, परिसरातून नियमित रोजगारासाठी शहरांकडे जाणे, हेसुद्धा त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले. कोरडवाहू परिसर असल्याने पाण्याची सातत्याने टंचाई या भागात असते.