चोपडा येथे बंद घरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:44 IST2019-03-04T00:43:51+5:302019-03-04T00:44:03+5:30
एक लाखांचा ऐवज लंपास

चोपडा येथे बंद घरात चोरी
चोपडा : शहरातील वृंदावन कॉलनीतील एका बंद घराच्या कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीच्या दागिने व रोख रकमेसह असा सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना २ ते ३ मार्च दरम्यान घडली. शहरात एका आठवड्यातील ही दुसरी घरफोडी असून चोरट्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .
शहरातील वृंदावन कॉलनीतील रहिवासी जितेंद्र रमेश सोनवणे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला व कपाटात ठेवलेले वीस हजार रुपये किंमतीची दहा ग्रॅम सोन्याची चैन, चौदा हजार किमतीचे पाच ग्रॅम सोन्याचे कानातील काप, दहा हजार किंमतीचे पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, एक हजार किमतीची अर्धा ग्रॅम सोन्याची नथ, आठ हजार किमतीची चार ग्रॅम सोन्याची अंगठी, तीन हजार किमतीचे चांदीची पैंजन व ब्रासलेट, चौदा हजार रोख रक्कम व दहा हजार किमतीचा एलईडी टी. व्ही असा सुमारे ९१ हजार पाचशे रुपयाचा ऐवज चोरून नेला.
याबाबत नूतन मनोहर पाटील (२८) रा. वृंदावन कॉलनी, चोपडा यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव भदाणे करीत आहेत.