तब्येत सांभाळा, पाऊस थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:18 IST2021-08-26T04:18:59+5:302021-08-26T04:18:59+5:30

उन्हाचा चटकादेखील वाढला कोरड्या वातावरणामुळे बसताहेत उन्हाचे चटके (डमी १०९३) लोकमत न्यूज नेटवर्क अजय पाटील जळगाव : जिल्ह्यात यावर्षी ...

Stay healthy, the rain stopped | तब्येत सांभाळा, पाऊस थांबला

तब्येत सांभाळा, पाऊस थांबला

उन्हाचा चटकादेखील वाढला

कोरड्या वातावरणामुळे बसताहेत उन्हाचे चटके

(डमी १०९३)

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव : जिल्ह्यात यावर्षी अनियमित स्वरूपाचा पाऊस झाला असून, जून व जुलै महिन्यांत नियमित सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाला आहे, तर ऑगस्टमध्ये यावर्षी जून- जुलैच्या तुलनेने जास्त पाऊस झाला असला तरी ऑगस्टची सरासरीदेखील यंदा कमीच आहे. आता पावसाने उसंत घेतली असून, तापमानात वाढ झाली आहे. त्यातच वातावरण पूर्णपणे कोरडे असल्याने तापमानाचा पारा ३३ अंशावर असतानाही उन्हाचे चटके असह्य होत आहेत. बदललेल्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होत असून, नागरिकांनी आरोग्य सांभाळण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.

गेल्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यात आर्द्रतेसोबतच हवादेखील चांगली असल्याने तापमानात घट होऊन वातावरण थंड झाले होते. मात्र, सोमवारपासून वातावरणात पुन्हा बदल होत असून, पावसाने उसंत घेऊन कडाक्याचे ऊन पडत आहे. विशेष म्हणजे उन्हाचे चटके हे उन्हाळ्यापेक्षादेखील अधिक कडक जाणवत आहेत. एकीकडे ऊन, तर काही दिवसांत पुन्हा पाऊस, ढगाळ वातावरण अशा दुहेरी वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होत असतो, अशा काळात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस

१. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातच सर्वाधिक १९६ मिमी पाऊस होत असतो. यावर्षी जून-जुलै महिन्याचा तुलनेत ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाला आहे.

२. ऑगस्ट महिन्याचा सरासरीइतका पाऊस झाला नसला तरी पहिल्या दोन महिन्यांच्या तुलनेत चांगला पाऊस झाला आहे. आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात ७९ मिमी पाऊस झाला आहे.

३. जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, मुक्ताईनगर तालुक्यांत यंदा समाधानकारक पाऊस झाला असून, अजून पावसाची गरज आहे.

४. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात यंदा सर्वांत कमी पाऊस झाला आहे.

आकडेवारी काय सांगते...

महिना - अपेक्षित पाऊस - झालेला पाऊस - किमान तापमान - कमाल तापमान

जून - १२३ मिमी - ८९ मिमी - २३ अंश - ३५ अंश

जुलै - १८९ मिमी - १११ - मिमी - २५ - ३४ अंश

ऑगस्ट - १९६ मिमी - ७९ मिमी - २२ - ३३ अंश

कोठे किती पाणीसाठा?

हतनूर - ३१ टक्के

वाघूर - ६१

गिरणा - ४५

वातावरण बदलले, काळजी घ्या

- बऱ्याच ठिकाणी हवामानात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे.

- एकीकडे कडक ऊन तर दुसरीकडे ढगाळ वातावरण. यामुळे बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

- व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांची जळजळ तसेच खोकला हे आजार बळावू शकतात. हे आजार टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या, तसेच अंगावर दुखणे काढणे टाळा, तसेच सार्वजनिक ठिकाणी जाणे आवश्यक असेल तर रुग्णांनी तोंडाला रुमाल बांधावा.

Web Title: Stay healthy, the rain stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.