जळगाव जिल्ह्यात ८१ गावांना एस.टी.चे दर्शन दुर्लभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 16:49 IST2017-10-11T16:33:49+5:302017-10-11T16:49:56+5:30
शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी रस्ता दुरुस्ती व एस.टी.बस सुरु करण्यासाठी दिले जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद सीईओंकडे निवेदन

जळगाव जिल्ह्यात ८१ गावांना एस.टी.चे दर्शन दुर्लभ
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. ११ : संपूर्ण जग हे मोबाईलवरील इंटरनेट सुविधेमुळे जळगाव जिल्ह्याशी जोडले गेले आहे. पण जिल्हा किंवा तालुक्याच्या गावातून आजही ८१ गाव, पाडे किंवा वसाहतींकडे जायला बस सेवा नाही. याकडे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद सीईओंनी लक्ष देवून रस्ते आणि बससेवा उपलब्ध करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य व स्थायी समिती सदस्य प्रताप पाटील यांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दरम्यानच्या काळात गाव तेथे रस्ते योजना राबविली. या योजनेनंतर एस.टी.महामंडळाने रस्ता तेथे बससेवा योजना राबविली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध कामात विभाजन होवून ग्रामीण रस्ते दुरुस्तीच्या योजना बंद होत गेल्या. अनेक रस्ते जिल्हा परिषदेकडे वर्ग झाले. त्यामुळे निधी अभावी रस्ते दुरुस्ती बंद झाली. रस्तेच खराब झाल्यामुळे एस.टी.महामंडळने खराब रस्त्यांवरील बससेवा देखील बंद केली.
८१ गावांना एस.टी.चे दर्शन दुर्लभ
जळगाव जिल्ह्यात सध्या ८१ गावातील बससेवा खराब रस्त्यांमुळे बंद आहे. यात पाचोरा तालुक्यातील ८, चाळीसगाव ६,जळगाव ७, एरंडोल ७,अमळनेर ४, भडगाव १,पारोळा ७, चोपडा ५, जामनेर ११, भुसावळ ३, यावल १२, रावेर ४, मुक्ताईनगर २, धरणगाव ३, बोदवड १.
जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार आहे. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागात रस्ते दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला व सार्वजनिक बांधकाम विभागाला पुरेसा निधी द्यावा. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीत तरतूद करावी.
-प्रताप गुलाबराव पाटील, जि.प.सदस्य, शिवसेना.