स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:15 PM2020-03-23T12:15:17+5:302020-03-23T12:15:32+5:30

जळगावकरांना सलाम : रस्ते, विविध चौक निर्मनुष्य, बाजारपेठ कडकडीत बंद, बसची चाकेही थांबली, हॉटेल-लॉजही ओस औद्योगिक वसाहतीमध्ये शुकशुकाट, संयम व संकल्पपूर्तीचे दर्शन

Spontaneous 'corona' closure! | स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

Next

जळगाव : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी रविवार, २२ मार्च रोजी पाळण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कडकडीत बंद पाळत ‘कोरोना’ला रोखण्यासाठी आपली एकजूट दाखवून दिली. ‘जनता कर्फ्यू’ला भरघोस प्रतिसाद देत शहरवासीयांनी ‘न भूतो....’ असा बंद पाळला. यामुळे शहरातील रस्ते, विविध चौक सकाळापासूनच सामसूम होते. रस्त्यावर केवळ पोलीस आणि अत्यावश्यक सेवा देणारी मंडळीच असल्याने सर्वत्र शांतता पसरली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२ रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत नागरिकांनीच ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन केले. त्यास सर्वच स्तरातून पाठिंबा मिळण्यासह नागरिकांनी स्वत: सहभागी होत कोरोनाला हद्पार करण्याचा निर्धार केला व सर्वांनी घरात राहणे पसंत केले. यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते सामसुम होते. त्याचबरोबर बस स्थानक, रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट होता.


बाजारपेठ कडकडीत बंद
व्यापारनगरी असलेल्या जळगावातील बाजारपेठाच बंद ठेवण्याचा निर्णय विविध व्यापारी संघटनांनी घेतला व तो प्रत्यक्षात उतरवूनदेखील दाखविला. तसेच औद्योगिक वसाहत, विविध दुकाने, हॉटेल व इतर सर्व अस्थापना बंद ठेवून कोणीही घराबाहेर पडणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली. त्यामुळे नेहमी वर्दळ असलेले शहरातील महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट, बी.जे. मार्केट, सुभाष चौक परिसर, सराफ बाजार, दाणा बाजार इत्यादी प्रमुख व्यापारी ठिकाण पूर्णपणे बंद होती.


‘न भूतो.....’ असा कडकडीत बंद
अनेक वेळा वेगवेगळ््या कारणांनी बंद पुकारण्यात येतो. त्याला कमी-अधिक प्रतिसाद मिळत असतो. मात्र सध्या कोरोनामुळे देशवासीयांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने स्वत:च्या कुटुंबासह देशवासीयांच्या आरोग्यासाठी सर्व जळगावकर एकवटले. त्यामुळे कोणीच बाहेर पडत नसल्याने शहरातील टॉवर चौक, चित्रा चौक, नेहरु चौक, रथ चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेट बँक चौक, कोर्ट चौक, काव्यरत्नावली चौक हे सर्व सामसूम होते. इतकेच नव्हे शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य होते. त्यामुळे शहरात सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत व त्यानंतर पुन्हा ५.०५ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वत्र शांतता होती.

सहभाग कौतुकास्पद
आदेश न देता जिल्हावासीयांनी जनता कर्फ्यूमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, हे कौतुकास्पद आहे. सुदैवाने जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण नाही, मात्र सर्वांना काळजी घेण्याबाबतचे गांभीर्य समजले असून यापुढेही सर्वांनी सहकार्य करावे. हे सर्वांचे हिताचे आहे.
-डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी


जनतेचे कौतुक
जनता कर्फ्यू चे पालन करुन जनता खरच कौतुकास पात्र ठरली आहे. यापुढचा काळ आणखी गंभीर असणार आहे. कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर जनतेने असेच सहकार्य करावे. एकजुटीने हा लढा उभारायचा आहे. हा जनता कर्फ्यू पहाटे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आला. आजपासून कलम १४४ लागू आहे.
-डॉ.पंजाबराव उगले,पोलीस अधीक्षक


दुपारच्या सुमारास मेडिकलही ‘लॉक’
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे़ शिवाय जनता कफ़र्युच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच सेवा ठप्प होत्या़ यात अनेक परिसरातील अनेक मेडिकल दुकाने बंद होते़ दुपारी चित्र बघितले असता संपूर्ण गांधी मार्केटमध्ये केवळ एकच मेडिकल सुरू होते़ नेहमीच्या औषधींशिवाय अत्यावश्यक असलेल्या रक्तदाब व मधुमेहाच्या औषधींसह मास्क व सॅनिटायझर घेण्यासाठी काही नागरिक दुकानावर गेले होते.

Web Title: Spontaneous 'corona' closure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.