Soybean oil to Shambhari | सोयाबीन तेल शंभरीकडे
सोयाबीन तेल शंभरीकडे

जळगाव : अमेरिकन डॉलरच्या वाढत्या दराचा इंधन, सोन्यासह खाद्य तेलावरही परिणाम होऊ लागला असून आयात होणाऱ्या पाम तेलाचे भाव वाढले आहेत. यात भरात भर अतिपावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने सोयाबीन तेलाचेही भाव वाढून तेलाला महागाईची फोडणी बसत आहे. सोयाबीन तेल ८७ रुपये प्रती किलोवरून ९६ तर पाम तेल ७५ रुपये प्रती किलोवरून ८८ रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. दुसरीकडे मात्र शेंगदाणा तेलाचे भाव १० रुपये प्रती किलोने कमी झाले आहेत.
दररोज प्रत्येक घर तसेच खाद्य पदार्थांच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम होत असतो. या पूर्वी आयात शुल्क वाढल्याने पाम तेल व सोयाबीन तेलाचे भाव वाढले होते. आता अतिपावसामुळे सोयाबीन तेलाचे भाव वाढले आहेत.
अमेरिकन डॉलरचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम
अमेरिकन डॉलरचे दर सातत्याने वाढत आहे. त्याचा परिणाम इंधन व सोने या भारतीय बाजारपेठेतील या दोन महत्त्वाच्या घटकांसह आता खाद्य तेलावरही त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. डॉलरचे दर ७०.८४ रुपयांवर पोहचले आहेत. डॉलरच्या या वाढत्या दरामुळे मलेशिलायमधून आयात होणाºया पामतेलाचे भाववाढीस मदत होत आहे. गेल्या महिन्यात ७५ रुपये प्रती किलो असलेले पामतेलाचे भाव डॉलरचे दर वाढल्याने ८८ रुपये प्रतिकिलोवर पोहचले आहेत.
२० दिवसात ९०० रुपये प्रति क्विंटलने वाढ
एरव्ही पाम तेलाचे भाव इतर तेलाच्या तुलनेत कमीच असतात. या तेलावर पूर्वी आयात शुल्क १५ टक्के होते. त्यात गेल्या वर्षी थेट दुप्पट वाढ करून ते ३० टक्के करण्यात आले. त्यामुळे पाम तेलाचे भाव वधारले होते. त्यानंतर अमेरिकन डॉलरचे दर वाढत गेल्याने तेलाचेही भाव वाढत आहेत. २० दिवसांपूर्वी ७५०० रुपये प्रति क्विंटलवर असलेल्या पाम तेलाचे भाव सध्या ८८०० रुपये प्रति क्विंटलवर पोहचले आहेत. त्यामुळे सर्वाधिक वापर असलेल्या सोयाबीन तेलाच्याही भाववाढीस मदत मिळत आहे. ८७०० रुपये प्रति क्विंटल असलेल्या सोयाबीन तेलाचे भाव आता ९६०० रुपये प्रति क्विंटलवर पोहचले आहेत.
शेंगदाणा तेलाचा दिलासा
पाम व सोयाबीन तेलाचे भाव वाढले असले तरी शेंगदाणा तेलाचे भाव कमी झाले आहे. १४० रुपये प्रती किलो असलेल्या शेंगदाणा तेलाचे भाव १३० रुपये प्रती किलोवर आले आहेत.
सामान्यांसह व्यापाऱ्यांचेही गणित बिघडले
९ ते १३ रुपये प्रति किलोने तेलाच्या दरात वाढ होत असली तरी याचा मोठा परिणाम सामान्यांसह व्यापाºयांच्याही गणितावर होत आहे. दररोज टनाने तेलाची खरेदी होत असलेल्या व्यापाºयांसाठी प्रती किलो नऊ रुपये वाढही गणित बिघडविणारे आहे.

अमेरिकन डॉलरचे दर वाढत असल्याने पाम तेलाचे भाव वाढले आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाचेही भाव वाढतात. त्यात आता अतिपावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने भाव वाढीत अधिकच भर पडत आहे.
- मनीष देवपुरा, तेल व्यापारी, जळगाव.

Web Title: Soybean oil to Shambhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.