वाहुळेची बदली होताच, अतिक्रमणधारक पुन्हा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:44+5:302021-09-08T04:21:44+5:30
जळगाव : काही महिन्यांपासून अतिक्रमण विभागाची जबाबदारी दिल्यानंतर प्रभारी उपायुक्त संतोष वाहुळे यांनी जोरदार कारवाई मोहीम राबविल्यामुळे बाजारपेठेतील रस्त्यांनी ...

वाहुळेची बदली होताच, अतिक्रमणधारक पुन्हा रस्त्यावर
जळगाव : काही महिन्यांपासून अतिक्रमण विभागाची जबाबदारी दिल्यानंतर प्रभारी उपायुक्त संतोष वाहुळे यांनी जोरदार कारवाई मोहीम राबविल्यामुळे बाजारपेठेतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र, वाहुळे यांची बदली होताच पुन्हा पूर्वीप्रमाणे रस्त्यांवर अतिक्रमण थाटायला सुरुवात केली आहे. यामुळे ऐन सण व उत्सवाच्या काळात बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
शहरातील फुले मार्केट, चौबे मार्केट, सुभाष चौक, घाणेकर चौक, बळीराम पेठ यासह शहरातील विविध मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे मनपातर्फे लेखा परीक्षक संतोष वाहुळे यांच्याकडे अतिक्रमणची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर वाहुळे गेल्या दीड ते दोन वर्षांत सर्व ठिकाणच्या रस्त्यावर वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेल्या बेकादेशीर अतिक्रमणधारकांवर जोरदार कारवाई मोहीम राबविली. या मोहिमेत दोन ते तीनवेळा त्यांच्यावर आणि अतिक्रमण विभागाच्या पथकावर दगडफेड झाल्याच्या घटनादेखील घडल्या. मात्र, तरीदेखील वाहुळे यांनी कारवाईची मोहीम सुरूच ठेवून, शहरातील अनेक रस्ते मोकळे केले आहेत. विशेष म्हणजे वाहुळे यांनी शहरात काही ठिकाणी अनधिकृतपणे बांधलेल्या पक्या अतिक्रमणावरही वरही कारवाई केली होती.
इन्फो :
सण व उत्सवाच्या काळात रस्त्यावर चक्काजाम
वाहुळे यांच्या बदलीनंतर फुले मार्केट, टॉवर चौक, चौबे मार्केट, सुभाष चौक या भागात पुन्हा पूर्वीप्रमाणे हातगाड्या लावायला सुरुवात केली आहे. शनिवारी व रविवारी मनपाला सुटी असल्यामुळे विक्रेत्यांनी टॉवर चौक ते चौबे मार्केटपर्यंतच्या रस्त्यावर दोन दिवस पूर्णपणे अतिक्रमण केले होते, तर सोमवारी पोळ्याच्या दिवशींही सकाळपासून या रस्त्यावर दुकाने थाटलेली होती. त्यामुळे रस्त्यांवर पुन्हा वाहतुक कोंडी झालेली दिसून आली, तर मंगळवारी सकाळी अधिक्रमण विभागाचे कर्मचारी बाजारपेठेत फिरले. मात्र, त्यांच्याकडून कुठलीही ठोस कारवाई न झाल्यामुळे विक्रेते पूर्वीप्रमाणे व्यवसाय करताना आढळून आले. दरम्यान, वाहुळे यांची बदली झाली असली तरी, त्यांनी अजून पदभार सोडलेला नाही. त्यामुळे अतिक्रमण विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी सांगितले, तर उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याशी `लोकमत`प्रतिनिधीने दोनवेळा संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.