दोन दिवस वेशांतर करुन सोनपत चोरट्यांना अटक
By विजय.सैतवाल | Updated: April 4, 2024 22:47 IST2024-04-04T22:47:27+5:302024-04-04T22:47:35+5:30
मध्यप्रदेशात जाऊन एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात

दोन दिवस वेशांतर करुन सोनपत चोरट्यांना अटक
जळगाव : सोनसाखळी चोरून फरार झालेल्या दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन अटक केली. दोन दिवस वेशांतर करून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे अटक केलेले दोघे पाच गुन्ह्यात फरार होते.
जळगावातील गायत्री नगरात पायी जात असलेल्या सुलोचना वसंत खैरनार (६०) या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरुन आलेल्यांनी लांबवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोलिस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, पोकॉ राजश्री बाविस्कर हे संशयितांना ताब्यात घेण्यासाठी मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील जुलवानिया येथे गेले. दोन दिवस वेशांतर करुन राहिल्यानंतर पथकाने ईराणी वस्तीतून भुसावळ येथील दोघ संशयितांच्या मुसक्या आवळल्या. दोघ संशयितांकडून ४० हजार रुपयांची मंगलपोत जप्त करण्यात आली आहे.
अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १, उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २, नंदुरबार शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ अशा एकूण पाच गुन्ह्यात हे संशयित फरार होते. अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे