...म्हणून फिरविली विद्यार्थ्यांनी आयटीआयकडे पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST2021-08-25T04:21:33+5:302021-08-25T04:21:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खासगी व शासकीय आयटीआयमधील प्रवेश प्रक्रियेस विद्यार्थ्यांकडून यंदा कमी प्रतिसाद मिळाला. यामुळे संस्थांमधील ...

... so students turn to ITI! | ...म्हणून फिरविली विद्यार्थ्यांनी आयटीआयकडे पाठ !

...म्हणून फिरविली विद्यार्थ्यांनी आयटीआयकडे पाठ !

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : खासगी व शासकीय आयटीआयमधील प्रवेश प्रक्रियेस विद्यार्थ्यांकडून यंदा कमी प्रतिसाद मिळाला. यामुळे संस्थांमधील प्रवेश शंभर टक्के होतील यादृष्टीने ‘प्रवेश प्रोत्साहन अभियान’ राबविण्यात येत आहे. मात्र, एकीकडे कोरोनामुळे पालकांनी आलेली आर्थिक अडचण व दुसरीकडे कमी शुल्कात डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांची आयटीआयकडे पाठ फिरविली असावी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया ही १ ऑगस्टपासून सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण ३० शासकीय व खासगी आयटीआय आहेत. या आयटीआयमधील जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मागील वर्षी १६ हजार ५१३ विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केले होते. मात्र, यंदा १० हजार ३७९ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. त्यापैकी १० हजार ७५ विद्यार्थ्यांनी अर्जांची पुष्टी केली आहे. दरम्यान, यंदा मागील वर्षीच्या तुलनेत राज्यातील खासगी व शासकीय आयटीआयमधील प्रवेशासाठी अर्जांचा ओघ घटलेला आहे. यामुळे संस्थांमधील प्रवेश शंभर टक्के होतील, या दृष्टीने ‘प्रवेश प्रोत्साहन अभियान’ राबविण्यात येत आहे.

यंदा मूल्यमापन पद्धतीनुसार दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाला. यात विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाले. यामुळे विद्यार्थ्यांनी डिप्लोमा अभ्यासक्रमाकडे आपली पावले वळविली आहेत. दुसरीकडे आयटीआयमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतात. कोरोनामुळे या विद्यार्थ्यांचे पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही खाजगी आयटीआयमधील शुल्क भरणे हे पालकांना शक्य नाही. त्यामुळे डिप्लोमाचे कमी शुल्क असल्याने विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रसंती दिली. त्यातच प्लेसमेंट नसल्याचाही फटका आयटीआयला बसला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले; परंतु अर्जांचा ओघ घटला असून, आयटीआयमधील संपूर्ण जागा भरल्या जातील, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अर्जासाठी ३१ पर्यंत मुदत

आयटीआय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विभागामार्फत प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आयटीआय संस्थेत दररोज समुपदेशन सत्र आयोजित केले जात आहे. दुर्गम व ग्रामीण भागात प्रवेशाबाबत माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे, तसेच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत, त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

- जिल्ह्यातील आयटीआय महाविद्यालय : ३० (सुमारे)

- आतापर्यंत नोंदणी केलेले विद्यार्थी : १०,३७९

- अर्जांची पुष्टी केलेले विद्यार्थी: १०,०७५

- मागील वर्षी आलेले अर्ज :१६,५१३

Web Title: ... so students turn to ITI!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.