स्मार्ट कार्ड योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST2021-04-07T04:16:33+5:302021-04-07T04:16:33+5:30
एस.टी. महामंडळ : नोंदणीसाठी प्रत्येक आगारात स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती जळगाव : राज्य परिवहन महामंडळातर्फे गेल्या दोन वर्षांपासून स्मार्ट कार्ड ...

स्मार्ट कार्ड योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
एस.टी. महामंडळ : नोंदणीसाठी प्रत्येक आगारात स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती
जळगाव : राज्य परिवहन महामंडळातर्फे गेल्या दोन वर्षांपासून स्मार्ट कार्ड योजना राबविण्यात येत असून, ३१ मार्चपर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी पुन्हा या योजनेला ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच स्मार्ट कार्डच्या नोंदणीसाठी प्रत्येक आगारात स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी सांगितले.
बनावट पास तयार करून अनेक नागरिक एसटी महामंडळाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेत असल्याचे राज्यभरात अनेक ठिकाणी प्रकार उघडकीस आले होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महामंडळाने आता गेल्या दोन वर्षांपूर्वी डिजिटल स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. महामंडळाच्या सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला हे कार्ड काढणे अनिवार्य केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडित असलेले ''स्मार्ट कार्ड'' काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलतधारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. जळगाव आगारातून आतापर्यंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यासह इतर सवलतधारक मिळून १५ हजारांहून अधिक जणांनी यासाठी नोंदणी करून, त्यांना स्मार्ट कार्डही मिळाले आहे.
इन्फो :
कोरोनामुळे आता पुन्हा मुदतवाढ
गेल्या वर्षापासून कोरोना सुरू झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना हे स्मार्ट कार्ड काढता आले नाही. त्यामुळे महामंडळाने गेल्या वर्षी पुन्हा मुदत वाढवून ३१ मार्च २०२१ पर्यंत केली. मात्र, तरीदेखील विद्यार्थी व नागरिकांचा स्मार्ट कार्ड काढण्याला फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. त्यामुळे महामंडळाने पुन्हा नागरिकांच्या सोयीसाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत या योजनेला मुदतवाढ दिली आहे.