पालथे झोपा अन् रक्तातील ऑक्सिजन वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST2021-05-06T04:17:03+5:302021-05-06T04:17:03+5:30
एकूण रुग्ण - ९,७६८ रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - ४,३६९ गृह विलगीकरण असलेले रुग्ण - ३,८६७ लोकमत न्यूज ...

पालथे झोपा अन् रक्तातील ऑक्सिजन वाढवा
एकूण रुग्ण - ९,७६८
रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - ४,३६९
गृह विलगीकरण असलेले रुग्ण - ३,८६७
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : देशभरात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून परिस्थिती इतकी बिघडली आहे की, स्मशानभूमीतही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला नंबर लागले आहेत. त्यात अनेक रुग्णांलयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता पडत आहे. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही रुग्णालयांमधील स्थिती याबाबत सारखीच झालीय. त्यामुळेच प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे अत्यावश्यक झालेय. अशातच कोरोनावरील घरगुती उपाय म्हणून पालथे झोपल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते, असा दावा वैद्यकीय तज्ज्ञांकडून केला जात आहे.
श्वसनाच्या या पद्धतीला प्रोनिंग असे म्हटल जाते. त्यामुळे घरच्याघरी उपचार घेऊन बरे होण्यासाठी हा सल्ला लाभदायक ठरत आहे. शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात असलेल्या कोरोना केअर सेंटरमध्येदेखील कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना मनपा वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून कोरोनाग्रस्त रुग्णांना विशेषत: होम आयसोलेशनच्या रुग्णांना पालथे झोपण्याचा सल्ला दिला आहे. या रुग्णांनी पालथे झोपल्यास त्यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढते. श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तो काही प्रमाणात कमी होतो.
पाठ बेडवर टाकून उताणे झोपलेल्या रुग्णाला हळुवारपणे पोटावर झोपवण्याने ॲाक्सिजनची पातळी वाढते. ॲाक्सिजन व्यवस्थित घेता यावा म्हणून पालथे झोपवणे या पद्धतीचा स्वीकार आधुनिक वैद्यकशास्त्राने केल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. तसेच रुग्ण जर होम आयसोलेशनमध्ये असेल तेव्हा त्याच्या ऑक्सिजनच्या तपासणीबरोबरच तापमान, ब्लडप्रेशर आणि रक्तातील साखरेची पातळी यांची नियमित तपासणी केली जाते.
ऑक्सिजनची पातळी कशी वाढवावी?
१. शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यासाठी संबंधित व्यक्तीने पोटावर झोपावे. पोटावर झोपताना पायांखाली आणि मानेखाली उशी घ्यावी. यानंतर दीर्घ आणि खोलवर श्वास घेऊन सोडावा. असे काही तास केले तरी शरीरातील ऑक्सिजन पातळी ९९ टक्क्यांपर्यंत वाढते.
२. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील प्रोनिंग पद्धतीने खोलवर श्वास घेत शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्याची शिफारस केलीय. यासह अनेक वैद्यकीय तज्ज्ञदेखील कोरोना बाधित रुग्णाला पालथे झोपण्याचा सल्ला देत असतात. या पद्धतीचा काहीअंशी रुग्णांना फायदादेखील होत आहे.
काय आहेत फायदे
पालथे झोपल्याने श्वसन सुधारते, फुफ्फुसातील वायुकोशिका उघडल्या जातात आणि श्वास घेणे सुलभ होते. काही एअरवेज हे फुफ्फुसाच्या मागील भागात असतात. विषाणू संसर्गामुळे झालेल्या न्युमोनियात आधीच वायूअभिसरणाचे कार्य प्रभावित होऊन ऑक्सिजनेशन कमी होते. सरळ झोपल्यावर मागील बाजूचे काही एअरवेज बंद होऊन रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण अजून कमी होते. प्रोनिंगमुळे फुफ्फुसातील सूक्ष्म श्वसन मार्गिका (अल्वीवोलायमधील एअरवेज) उघडण्यास मदत होते. ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
- डॉ. राधेश्याम चौधरी, सचिव, आय.एम.ए.
याकडेही लक्ष असू द्या
जेवणानंतर कमीत कमी एक तास तरी पालथे झोपू नका. जोपर्यंत तुम्हाला सहन होईल तोपर्यंतच पालथे झोपा. ३ महिन्यांपेक्षा जास्तीची गर्भधारणा, डिप व्हेन थ्रोंबोसीस, निवडक हृदयरोग, मणके, पेल्विस किंवा फिमर हाडाचे फ्रॅक्चर इत्यादी केसेसमध्ये प्रोनिंग टाळावे.
-डॉ.जगदीश पाटील, एम्स,दिल्ली
हे होतील फायदे
रक्तातील ऑक्सिजनच्या प्रमाणात होणाऱ्या कमतरतेचे लवकर निदान झाले नाही तर गुंतागुंती वाढतात. वेळेवर पालथे झोपवले व श्वसनास मदत केली तर अनेक रुग्णांने प्राण वाचवता येतील. एखाद्या सुदृढ व्यक्तीच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता ही नेहमी चांगली असते. मात्र बाधित झाल्यानंतर ही क्षमता कमी होत असते. फुफ्फुसांची बाहेरील श्वसनलिका ऑक्सिजन घेण्यास असमर्थ ठरतात. अशावेळी पालथे झोपल्यास पाठीच्या बाजूला असलेला श्वासनलिका उघडून श्वास घेण्यास फायदेकारक ठरतात.