साहेब, निवडणुका आल्या हो,तेवढे निधीचे बघा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST2021-08-26T04:20:27+5:302021-08-26T04:20:27+5:30
कुजबुज -सचिन देव जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्याने जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले असून, आपल्या ...

साहेब, निवडणुका आल्या हो,तेवढे निधीचे बघा
कुजबुज -सचिन देव
जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्याने जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले असून, आपल्या मतदारसंघांमधील कामे मार्गी लागण्यासाठी जिल्हा परिषदेत त्यांच्या चकरा मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. विशेष म्हणजे एरव्ही जिल्हा परिषदेच्या साहेबांना हुकूम सोडणारे पदाधिकारी आता साहेबांमागे नुसती पळापळ करीत आहे. बुधवारी दोन पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनात येऊन बसले होते. साहेब कसे काय, काय म्हणतात अजून, अशा प्रकारची नानाविध विचारपूस करीत काही लागले तर कळवा..अशी मैत्रीची ग्वाही दिली अन् साहेब, निवडणुका आल्या हो.. तेवढे निधीचे बघा..अशी स्मित हास्याने संबंधित साहेबांना साद घातली म्हणे..
मात्र, या स्मित हास्याने साहेबांनी काही लगेच फाईल मार्गी लावली नाही. परंतु, या पदाधिकारी महाशयांनी तुम्ही तरी बरे आहात, तिकडे महसूलचे अधिकारी तर टक्केवारी गोळा करीत असल्याचा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे गौप्यस्फोट केला. यावर या अधिकाऱ्यांनी अहो, तुम्ही तर मोठे राजकीय व्यक्तिमत्त्व आहात..तुमच्याकडून कसे घेणार..असा प्रश्न या पदाधिकाऱ्यांकडे केला. यावर पदाधिकाऱ्याने अहो, महसूल विभागात मोठी साखळी आहे, एका फाईलचे दोन हजार रूपये चालू आहेत म्हणे..अशा प्रकारची गुगलीच या महाशयांनी टाकल्यामुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी महोदय चांगलेच अचंबित झाले..यावर शेवटी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी असेल पुरावा, तर उरून-पुरून माहिती काढण्याचा सल्लाही दिला..