जीवनाचे तत्त्वज्ञान सोप्या शब्दात सांगणारी बहिणाबाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:02 IST2018-05-28T01:02:24+5:302018-05-28T01:02:24+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘चाळता स्मृतीची पाने’ या सदरात प्रा.ए.बी. पाटील लिहिताहेत जीवनाचे तत्त्वज्ञान सोप्या शब्दात सांगणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी...

जीवनाचे तत्त्वज्ञान सोप्या शब्दात सांगणारी बहिणाबाई
लौकिक अर्थाने बहिणाबाई अशिक्षित होती. ना तिने पाटी-पुस्तक हाती घेतले ना ती कोणत्या पाठशाळेत गेली. पण जीवनाचे तत्त्वज्ञान तिने इतक्या सहज पद्धतीने व सोप्या शब्दात सांगितले आहे की, थक्क व्हायला होते. तिचा काळ लक्षात घेतला तर अजून स्तिमित व्हायला होते. जीवनाच्या पाठशाळेत सर्वचजण जातात पण सर्वांनाच जीवनातील प्रसंग, घटना, माणसं, माणसांचे वागणे, निसर्ग वाचता येतात असे नाही. बहिणाबाईने ह्या सर्व गोष्टी आपल्या पारखी नजरेने पारखून घेतल्या आहेत. आपल्या चिकित्सक व तल्लख बुद्धीने आणि सूक्ष्म निरीक्षण शक्तीने जाणून घेतल्या आहेत. तिचे ज्ञान अनुभवातून आलेले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगी तिने केलेले भाष्य अचूक व सटीक आहे.
मानवी जीवनाचे सार परोपकारात आहे. म्हणून ती, ‘हिरीताच देन घेन’ कवितेत स्पष्टपणे सांगते की, हिरीताच देन घेन पोटासाठी नाही. ‘नको लागू जीवा सदा मतलबापाठी’ म्हणत असताना ती जगण्याचे मर्मच स्पष्ट करते. केवळ स्वत:साठी जगणे म्हणजे जगणे नाही. दुसºयाच्या मदतीसाठी हात आखडता घेतला तर तो हात काय कामाचा, संकटाच्या प्रसंगी दुसºयाच्या मदतीला नाही धावले तर ते पाय काय कामाचे! म्हणून ती आपल्या जीवाला सांगते की जो पीडला गेला आहे त्याचं दु:ख समजून घे, जो गांजलेला आहे त्याची मदत कर. जीवन कसं जगावं याबद्दल ती म्हणते,
‘‘जग जग माझ्या जीवा, अस जगणं तोलाच
उच्च गगना सारखं, धरित्रीच्या रे मोलाच।’’
बहिणाबाईची जीवनावरची, जगण्यावरची श्रद्धा वादातीत आहे. पण ते जीवन कसे असावे याबद्दलचे तिचे विचारही सुस्पष्ट आहेत. प्रत्येक ठिकाणी माणसाचे मी पण आडवे येते. अहंकाराने तो इतका फुगतो की त्याला वाटते त्याच्या इतका मोठा कोणीही नाही. बहिणाबाई अगदी सोप्या शब्दात त्या अहंकाराच्या फुग्यातील हवा काढून घेते. तीव्र भुकेच्या वेळी अन्नाचा एक घास, तहान लागलेली असताना पाण्याचा एक घोट माणसापेक्षा मोठा असतो. माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या कृतघ्नपणाचा ती धिक्कार करते व अशा माणसांपेक्षा गोठ्यातले जनावर बरे असे ती म्हणते व माणसाला पोट तिडकीने प्रश्न करते,
‘मन’ ह्या कवितेत चंचल मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न बहिणाबाईने केला आहे. माणसाच्या मनावर तिने केलेले भाष्य म्हणजे तिची माय सरस्वती तिला बोली शिकविते याची साक्ष आहे. मन कसे चंचल आहे, लहरी आहे, जहरी आहे, चपळ आहे, पाखरा सारखे आहे, खसखसच्या दाण्यासारखे लहान व आकाशासारखे विशाल आहे याचे वर्णन करून शेवटी देवालाच प्रश्न करते की, ‘‘देव अस कस मन घडल, कुठे जागेपणी तुले असे सपन पडल.’’
मन म्हणजे देवाला जागेपणी पडलेले स्वप्न आहे ह्या ओळी वाचल्यानंतर वाटते की, बहिणाबाईच विधात्याला जागेपणी पडलेले सुंदर स्वप्न आहे.
(क्रमश:)