चांदीचा भाव १.८० लाखावर, एका दिवसात ११ हजारांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:34 IST2025-10-14T15:34:02+5:302025-10-14T15:34:19+5:30
वाहनांच्या वेगवेगळ्या भागासह इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये चांदीची आवश्यकता असते. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात औद्योगिक मागणी असल्याने जगभरात चांदीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

चांदीचा भाव १.८० लाखावर, एका दिवसात ११ हजारांची वाढ
विजयकुमार सैतवाल -
जळगाव : दिवसेंदिवस वाढत जाणारा तुटवडा व त्यात वाढती मागणी यामुळे चांदीचे भाव झपाट्याने वाढत आहेत. सोमवारी (दि. १३) एकाच दिवसात चांदीच्या भावात ११ हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ८० हजार रुपयांवर पोहोचली. सोन्याच्याही भावात एक हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २४ हजार ७०० रुपयांवर पोहोचले.
वाहनांच्या वेगवेगळ्या भागासह इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये चांदीची आवश्यकता असते. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात औद्योगिक मागणी असल्याने जगभरात चांदीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
गेल्या पाच वर्षांतील चांदीतील भाववाढ
दिनांक झालेली वाढ भाव
१३ ऑगस्ट २०२० ४००० ६७,५००
४ ऑक्टोबर २०२२ ५००० ६२,०००
५ एप्रिल २०२३ २९०० ७५,०००
२३ ऑक्टोबर २०२४ १५०० १,००,०००
२७ सप्टेंबर २०२५ ३८०० १,४४,०००
ऑक्टोबर महिन्यातील भाववाढ
९ ऑक्टोबर २०२५ ११,२०० १,६४,०००
१० ऑक्टोबर २०२५ ३००० १,६७,०००
११ ऑक्टोबर २०२५ २००० १,६९,०००
१३ ऑक्टोबर २०२५ ११,००० १,८०,०००
जागतिक पातळीवर चांदीचा तुटवडा निर्माण झाल्याने भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. बुकिंग केल्यानंतर चांदी दीड महिन्यानंतर मिळत आहे. भाव दोन लाखांपर्यंत जाऊ शकतात. सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक
पाच दिवसांत दोन वेळा ११ हजारांनी वाढ
सातच दिवसांत चांदीचे भाव प्रतिकिलो २९ हजार ४०० रुपयांनी वधारले. ६ ऑक्टोबर रोजी चांदी एक लाख ५० हजार ६०० रुपयांवर होती. ती १३ ऑक्टोबर रोजी एक लाख ८० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
पाच दिवसांपूर्वी, ९ ऑक्टोबर रोजी चांदीमध्ये ११ हजार २०० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा
१३ ऑक्टोबर रोजी ११ हजारांची वाढ झाली आहे.
बुकिंगनंतर दीड महिन्यानंतर मिळते : जगभरात चांदीसाठी अगोदर बुकिंग करून ठेवावे लागत आहे. बुकिंगनंतरही तब्बल दीड महिन्यानंतर चांदी मिळत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.