जळगाव : गेल्या काही दिवसांपासून किरकोळ चढउतार होत असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी थेट दोन हजार रुपयांनी घसरण होऊन ती ६२ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली. गेल्या आठ महिन्यांतील हे सर्वांत कमी भाव आहेत. सोन्याच्याही भावात ५५० रुपयांची घसरण होऊन ते ४७ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर आले.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून किरकोळ तर कधी मोठा चढउतार होत असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी पुन्हा मोठी घसरण झाली. यामध्ये दोन आठवड्यांपूर्वी ६६ हजारांच्या पुढे असलेल्या चांदीच्या भावात एक हजाराने घसरण होऊन ती गेल्या आठवड्यात ६५ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली होती. तेव्हापासून त्याच भावावर स्थिर असलेल्या चांदीच्या भावात पुन्हा एक हजाराने घसरण होऊन ती गुरुवारी (दि. १६) ६४ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली होती. त्यानंतर आता शुक्रवारी पुन्हा दोन हजार रुपयांची घसरण होऊन चांदी ६२ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली.
आठ महिन्यांतील नीचांकी
शुक्रवारी झालेल्या घसरणीमुळे चांदी आठ महिन्यांतील सर्वांत कमी भावावर आली आहे. यापूर्वी ९ जानेवारी रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात पाच हजार ८०० रुपयांची घसरण होऊन ती ६४ हजार ५०० रुपयांवर आली होती. त्यानंतर दोन दिवसांत ११ जानेवारी रोजी पुन्हा चांदीत एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ६३ हजार रुपये प्रतिकिलोवर आली होती. त्यानंतर मात्र भाववाढ होत जाऊन चांदी ६४ हजारांच्या पुढेच होती. आता ती ६२ हजार ५०० रुपये प्रतिकिलो या नीचांकी भावावर आली आहे.
सोने ४७ हजार ३०० रुपयांवर
चांदीसोबतच सोन्याच्याही भावात शुक्रवारी घसरण झाली. ४७ हजार ८५० रुपये प्रतितोळ्यावर असलेल्या सोन्याच्या भावात शुक्रवारी ५५० रुपयांची घसरण होऊन ते ४७ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर आले. या पूर्वी ११ ऑगस्ट रोजी सोने ४७ हजार ४०० रुपयांवर होते. त्यानंतर मात्र ते वाढत गेले होते. आता पुन्हा त्यात घसरण झाली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्या-चांदीची मागणी कमी झाल्याने व भारतीय शेअर बाजाराचा परिणाम होऊन सोन्या-चांदीत घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.