विद्युत खांब हटविण्याच्या निधीच्या प्रस्तावावर नगरविकास मंत्र्यांची स्वाक्षरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST2021-08-20T04:20:57+5:302021-08-20T04:20:57+5:30
पुढील आठवड्यापासून कामाला सुरुवात ? : पालकमंत्र्यांची माहिती ; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर ...

विद्युत खांब हटविण्याच्या निधीच्या प्रस्तावावर नगरविकास मंत्र्यांची स्वाक्षरी
पुढील आठवड्यापासून कामाला सुरुवात ? : पालकमंत्र्यांची माहिती ; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला प्रमुख अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्यासाठीच्या निधीच्या मनपाच्या प्रस्तावावर अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली आहे. बुधवारी रात्री उशिरा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास मंत्र्यांची भेट घेट घेऊन मनपाने २५ कोटीमधील शिल्लक दीड कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली आहे. आता याबाबत सोमवारी मंजुरीचे पत्र देऊन पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
गेल्या वर्षभरापासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम विद्युत खांबांमुळे थांबले आहे. हे विद्युत खांब काढले जात नाहीत तोपर्यंत या पुलाचे पुढील काम होणे शक्य नाही. अनेक महिन्यांपासून मनपा प्रशासन, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाची या कामाबाबत टोलवा - टोलवी संपल्यानंतर आता मनपाने दिलेल्या दीड कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिल्यामुळे विद्युत खांब हटविण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
‘लोकमत’ने ५ लाख नागरिकांचा प्रश्न लावून धरला
शहरातील १ लाख नागरिकांसह चोपडा, जळगाव व यावल तालुक्यांमधील ४ लाख असे एकूण ५ लाख नागरिकांच्या दृष्टीने शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. विद्युत खांब हटविले जात नसल्याने ‘लोकमत’ने याबाबत सातत्याने वृत्त प्रकाशित करून, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले. ‘लोकमत’कडून सुरु असलेल्या पाठपुराव्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित होऊन अखेर विद्युत खांब हटविण्याच्या प्रस्तावावर नगरविकास मंत्र्यांनी स्वाक्षरी करून, प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक पाऊल पडले आहे.
पुढील आठवड्यापर्यंत होऊ शकते कामाला सुरुवात
महावितरणच्या माध्यमातून विद्युत खांब हटविण्याचे काम पूर्ण होणार असून, महावितरणने याबाबतचे अंदाजपत्रक तयार करून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासनाकडून दोन दिवसात याबाबत अधिकृत मंजुरी जाहीर केली जाणार असून, निधी वर्ग झाल्यानंतर पुढील आठवड्यापर्यंत या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
कोट..
शिवाजीनगर उड्डाणपूल हा केवळ जळगाव शहरातील नागरिकांसाठीच नाही तर जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. काही कारणास्तव या पुलाचे काम रखडले होते. विद्युत खांब हटविण्याचे काम या पुलात मुख्य अडथळा बनले होते. मात्र, नगरविकास मंत्र्यांनी याबाबत मनपाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करून, मुख्य अडथळा दूर केला आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाईल.
-गुलाबराव पाटील, पालकमंत्री