ठेवी परत मिळत नसल्याने जळगाव जिल्हा उपनिबंधकांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:54 IST2019-11-15T11:50:08+5:302019-11-15T11:54:12+5:30
ठेवीदार संतप्त : ठेवी का मिळत नाही?

ठेवी परत मिळत नसल्याने जळगाव जिल्हा उपनिबंधकांना घेराव
जळगाव - जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवी दहा-बारा वर्षे होऊनही परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी गुरुवारी जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांना त्यांच्याच दालनात गाठून घेराव घातला. तसेच ठेवी का मिळत नाही? असा सवाल उपस्थित करून ठेवीदारांनी उपनिबंधकांना धारेवर धरले.
जिल्ह्यातील ठेवीदारांना गेल्या दहा-बारा वर्षापासून त्यांच्या ठेवी परत मिळत नसल्याचे चित्र असून सहकार विभागाकडून ठेवीदारांची घोर निराशा झाली आहे. अनेक ठेवीदार तर मयत झाले तरीदेखील त्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळाला नाही. यासंदर्भात जळगाव जिल्हा महिला ठेवीदार समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्ह्यातील ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा संध्या चित्ते, प्रवीणसिंग पाटील यांनी ठेवीदारांच्या ठेवींसंदर्भात उपनिबंधकांना धारेवर धरले.
अ?क्शन प्लॅनची अंमलबजावणी नाही
तत्कालीन सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरविण्यात आलेल्या अॅक्शन प्लॅनवर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी का करण्यात आली नाही? ठेवीदारांना निव्वळ आश्वासने देऊन वेळ का मारून नेली जात आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती ठेवीदारांकडून करण्यात आली.
सहकार आयुक्तांना आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर उपनिबंधकांनी बैठकीचे आश्वासन दिले होते. ते का पाळले जात नाही? असा सवालही ठेवीदारांना उपनिबंधकांना केला.
यावेळी लक्ष्मण कोल्हे, ताराबाई माळी, मीराबाई नारखेडे, कल्पना बढे, शारदा चौधरी, मधुकर बढे, नारायण चौधरी, चित्रकला फेगडे, योगीता घोराडे, स्वाती फेगडे, वैशाली नेहते, निलीमा पाटील, लता लोखंडे आदी उपस्थित होते.