पावसाळ्यानंतर शहरातील रस्त्यांच्या कामांचा ‘श्रीगणेशा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST2021-04-07T04:16:11+5:302021-04-07T04:16:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील नागरिक सध्यस्थितीत अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. शहरातील नागरिकांच्या दृष्टीने रस्त्यांची समस्या महत्वाची आहे. ...

पावसाळ्यानंतर शहरातील रस्त्यांच्या कामांचा ‘श्रीगणेशा’
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील नागरिक सध्यस्थितीत अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. शहरातील नागरिकांच्या दृष्टीने रस्त्यांची समस्या महत्वाची आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आवश्यक असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्वाच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या समस्या मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. रस्त्यांची समस्या मार्गी लावण्यासाठी निधीची तरतूद केली जात असून, पावसाळ्यानंतर शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली जाणार असल्याची माहिती नवनियुक्त महापौर जयश्री महाजन यांनी दिली.
महापौर जयश्री महाजन यांनी मंगळवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. आगामी काळात शहरातील विकास आराखड्याबाबत असलेल्या आपल्या धोरणांची माहिती महापौरांनी दिली. ‘लोकमत’ जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी महापौरांचे स्वागत केले. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे व शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे आदी उपस्थित होते.
रस्त्यांच्या दुरुस्तीचे लवकरच काम सुरू करू
पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून, याबाबत सोमवारी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबतच्या सूचना दिल्याची माहिती महापौरांनी दिली. पावसाळ्यात नवीन रस्त्यांचे काम हाती घेणे शक्य नाही. त्यामुळे नवीन रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.
गाळेधारकांचे वर्गीकरण करून, हा प्रश्न मार्गी लावू
शहरातील मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न महत्त्वाचा असून, यामध्ये राज्य शासनाच्या मदतीने योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गाळेधारकांच्या योग्य मागणीचा विचार करून, त्यात व्यावसायिक व अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांचे वर्गीकरण करून, गाळे मूल्यांकनाचे दर निश्चित केले जाणार आहे. गरज पडल्यास राज्य शासनाकडे पाठपुरावा करून कायद्यात काही प्रमाणात बदल करण्याबाबतचा पाठपुरावा देखील करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
‘अमृत’साठी मजीप्रा, मक्तेदार व मनपा प्रशासनाच्या समन्वयाने काम करू
अमृत योजनेतंर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची मुदत संपली आहे. याबाबत मक्तेदार व मनपा प्रशासनाकडून झालेल्या उशिराबाबत कारणमीमांसा केली जाणार आहे. त्यात काम उशिरा झाल्याबाबतची कारणे योग्य वाटली तर या कामाला मुदतवाढ देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. यासह या योजनेचे उर्वरित कामे चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे मक्तेदार व मनपा प्रशासन यांच्यात समन्वय घालून हे काम तातडीने करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
वाढीव भागातील गटारी करण्यावर भर
भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून शहरातील ५५ टक्के भाग व्यापला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शहरातील उर्वरित ४५ टक्के काम होणार आहे. यासाठी बराच उशीर होऊ शकतो. त्यामुळे शहरातील वाढीव भागांमध्ये गटारी तयार करण्याच्या कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. यासह शहरातील आव्हाणे शिवारातील बंद पडलेला घनकचरा प्रकल्प देखील कार्यान्वित करण्याबाबत संपूर्ण माहिती घेऊन, काम लवकर सुरू करण्यावर भर दिला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.