श्रावणसरींनी रविवारच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:08 IST2019-08-04T23:08:11+5:302019-08-04T23:08:38+5:30

दमदार पावसाने सर्वांनाच दिलासा

Shravanasari doubles the joy of Sunday holidays | श्रावणसरींनी रविवारच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित

श्रावणसरींनी रविवारच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित

जळगाव : सलग आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने संपूर्ण जिल्हा चिंब झाला असून बळीराजाही सुखावला आहे. त्यात शनिवार, ३ आॅगस्टपासून सुरू असलेल्या श्रावण सरी रविवारीही बरसत राहिल्याने शहरवासीयांच्या ‘वीकेंड’सह व रविवारच्या सुट्टीचाही आनंद द्विगुणित झाला.
मोठ्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसाने सध्या चांगलीच कृपा केली असून आठ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. रिमझिम पावसाच्या सरींमध्ये मध्येच दमदार पावसाची हजेरी यामुळे श्रावण सरींचा खरा आनंद जिल्हावासीय घेत आहेत. २६ जून रोजी दमदार पाऊस झाला व सर्वांना दिलासा मिळाला. त्यानंतर दररोज अधून-मधून पाऊस सुरूच आहे.
२७ जुलै रोजी सुरू झालेला पाऊस कायम असल्याने जिल्हा चिंब झाला आहे. शनिवारी सकाळी १० आणि दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उन पडले होते. त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण झाले.
ठिकठिकाणी तळे तर कोठे पावसाचा आंनद
जिल्हा क्रीडा संकूल, नवीपेठ, बी.जे. मार्केट परिसर, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान, जिल्हा रुग्णालयासमोर, बजरंग बोगदा इत्यादी भागात पाणी साचले. त्यात शनिवारी व रविवारी ऐन संध्याकाळी बाजारपेठेत व बाहेर फिरायला आलेल्यांसह घरी परतणारे विद्यार्थी, नोकरदार हेदेखील पावसात सापडले. अनेकांनी दुकान, रुग्णालय परिसर व वाटेत कोठेतरी थांबून पावसापासून बचाव केला. तर अनेकांनी ओले होतच घरी जाण्याचा निर्णय घेतला व पावसाचाही आनंद लुटला. रविवारीदेखील अनेकांनी पावसात भिजत रविवारची सुट्टी ‘एन्जॉय’ केली.
रस्ते चिखलमय
पावसामुळे सर्वांना दिलासा असला तरी शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांमधील रस्ते चिखलमय झाले आहेत. यामुळे नागरिकांना पायी चालतानाही मोठी कसरत करावी लागत आहे. अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे रस्त्यांचे खोदकाम झाले व त्यानंतर हे रस्ते व्यवस्थित दुरुस्त न केल्यामुळे ही स्थिती ओढावली असून शहरातील प्रत्येक भागात सारखीच परिस्थिती निर्माण झाल्याने शहरवासीय हैराण झाले आहेत.
शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्यांचेही खोदकाम झाले आहे. खोदण्यात आलेल्या भागाची दुरुस्ती करून हे रस्ते पूर्ववत करण्याची गरज होती, मात्र संबधित मक्तेदाराकडून हे काम झाले नाही. त्यामुळे मातीमुळे सगळीकडे चिखल झाला आहे. खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती व्यवस्थित न झाल्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे.
वाहनधारकांची कसरत
चिखलामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. चिखलामुळे वाहने घसरत असून वाहनाचा ब्रेक लावणेही जिकरीचे ठरत आहे. जिल्हाधिकारी निवासस्थान ते गिरणा टाकीदरम्यानचा रस्ता असो की ख्वाजामिया चौक, रिंग रोड, पिंप्राळा रोड, वाघ नगर परिसर, महाबळ परिसरातील अनेक कॉलनी भाग येथे मोठे हाल होत आहेत.

Web Title: Shravanasari doubles the joy of Sunday holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव