जळगावात मनपाच्या नगररचना विभागाला कुलूप ठोकले शिवसेनेच्या गटनेत्यास अटक व सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:42 PM2018-09-18T12:42:42+5:302018-09-18T12:44:59+5:30

महापौर निवडीपूर्वीच भाजपा व सेनेत रंगला ‘सामना’

Shiv Sena's group leader arrested and rescued by LPO in Jalgaon municipal corporation department | जळगावात मनपाच्या नगररचना विभागाला कुलूप ठोकले शिवसेनेच्या गटनेत्यास अटक व सुटका

जळगावात मनपाच्या नगररचना विभागाला कुलूप ठोकले शिवसेनेच्या गटनेत्यास अटक व सुटका

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखलसाठी प्रतिष्ठा पणालाअधिकारी अवघ्या दहा मिनीटातच मनपात परतले

जळगाव : मनपाच्या नगररचना विभागात गेल्या सहा महिन्यांपासून बांधकाम मंजुरीच्या फाईलींचा निपटारा होत नसल्याने सोमवारी शिवसेनेचे मनपा गटनेते अनंत जोशी यांनी सकाळी १०.१५ वाजता नगररचना विभागाला कुलूप ठोकले.
पोलीस व उपायुक्तांच्या मध्यस्थीने त्यांनी पंधरा मिनिटातच कुलूप उघडले. मात्र, त्यानंतर जोशींवर गुन्हा दाखल करण्यासाठी दिवसभर नाट्य रंगले. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी सेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी तर गुन्हा दाखल व्हावा यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांनी प्रतिष्ठा पणास लावली. अखेर सायंकाळी गुन्हा दाखल होऊन जोशींना अटकही झाली त्यानंतर जामीनावर त्यांची सुटका झाली.
मनपा नगररचना विभागात गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे ३०० ते ३५० बांधकाम फाईल्स मंजुरीसाठी पडून आहेत. त्यांचा निपटारा व्हावा यासाठी अनंत जोशी हे सोमवारी सकाळी १० वाजता नगररचना विभागात आले. मात्र, या ठिकाणी अधिकारी उपस्थित नव्हते. तर केवळ एक अभियंता व एक कर्मचारी उपस्थित होता.
तुम्ही तुमचे काम केले आम्ही आमचे काम करु
जोशी यांनी आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे नगररचना विभागात फाईलींचा निपटारा होत नसल्याची तक्रार केली. मात्र,आयुक्तांनी आंदोलनाचा हा मार्ग चुकीचा असल्याचे सांगत ‘तुम्ही तुमचे काम केले, आता आम्ही आमचे काम करु’ असे जोशी यांना सांगितले. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांना या प्रकरणी जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
आयुक्तांच्या सूचनेनंतर नगरचना विभागाचे अधिकारी शहर पोलीस ठाण्यात
मनपा आयुक्तांनी नगररचना विभागाच्या अधिकाºयांना जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर नगररचना सहाय्यक संचालक अनंत धामणे यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. मात्र, सुमारे अर्धातास पुढचे आदेश येईपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यातच थांबून होते. त्यानंतर अर्धा तासानंतर शहर पोलीस ठाण्यात जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रि येला सुरुवात केली.
गुलाबरावांची आयुक्तांना विनंती अन् मनपा कर्मचारी पोलीस स्टेशनमधून फिरले माघारी
आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर हा गुन्हा दाखल होवू नये म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आयुक्तांना फोन करून गुन्हा दाखल न करण्याची विनंती केली. त्यानंतर आयुक्तांनी देखील शहर पोलीस ठाण्यात जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या सर्व अधिकाºयांना गुन्हा दाखल न करण्याचा सूचना दिल्या. आयुक्तांच्या फोननंतर सर्व अधिकारी अवघ्या दहा मिनीटातच मनपात परतले.
गुन्हा दाखल करण्याची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची आयुक्तांना सूचना
सूत्रांनी सांगितले की, दुपारी ३ वाजेच्या सुमारास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयुक्त चंद्रकांत डांगे यांना फोन करून अनंत जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा सूचना दिल्या. त्यानंतर आयुक्तांनी नगररचना विभागाच्या कर्मचाºयांना शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पुन्हा पाठविले. नगररचना सहाय्यक संचालक अनंत धामणे यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक एच.एम.खान, नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाचे १५ कर्मचारी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल झाले.
फिर्यादी होण्यास मनपा कर्मचाºयांची टाळाटाळ
गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यानंतर मनपाचा कोणताही कर्मचारी फिर्यादी होण्यास तयार नसल्याचे दिसून आले. नगरचना सहाय्यक संचालक अनंत धामणे यांनी देखील फिर्यादी होण्यास नकार दिला. त्यानंतर एच.एम.खान हे गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी होण्यास तयार झाले. मात्र, दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास पुन्हा त्यांनी ही नकार दिला.
महापालिकेतील आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजी आहे. ही मंडळी एवढे वर्षे सत्तेत होती, त्यावेळी त्यांनी काय केले? आता सत्तांतर होताच कामात अडथळे आणण्याचा प्रकार सुरु केला आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. केवळ प्रसिद्धीसाठी ही स्टंट बाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी मी कुणालाही फोन केला नाही.
-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री.
नगररचना विभागाकडून नागरिकांच्या प्रलंबित फाईलींचा निपटारा होत नसल्याने अनंत जोशी यांनी तक्रार केली. त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी सोमवारी कुलूप ठोकले. जोशी यांनी कुलूप लावणे चुकीचे होते. यासाठी आयुक्तांना फोन करून जोशी यांच्यावतीने माफी मागितली. मात्र, त्यांनी केवळ हा वाद वाढवायचा होता. म्हणून हा गुन्हा दाखल केला आहे. आयुक्तांनी विसरु नये की भविष्यात गाठ शिवसेनेशी आहे. वेळ आल्यावर शिवसेना स्टाईल दाखविली जाईल.
-गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री
सोमवारी दिवसभर कार्यक्रमांमध्ये व्यस्त होतो, त्यामुळे अनंत जोशी यांच्या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती नाही. आयुक्तांनी त्यांचे काम केले आहे. आम्ही विकासाचे राजकारण करतो, दबावाचे राजकारण करीत नाही. सेनेच्या नगरसेवकांना पराभव जिव्हारी लागल्याने चुकीचे आरोप त्यांच्यांकडून केले जात आहेत.
-सुरेश भोळे, आमदार
अनेक महिन्यांपासून नगररचना विभागात भोंगळ कारभार सुरु आहे. सर्वसामान्यांचा बांधकाम परवानगीच्या अनेक फाईली नगररचना विभागात पडून आहेत.त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही.आयुक्तांकडे तक्रारी करुन देखील लक्ष दिले जात नसल्याने नाईलाजास्तव कुलूप लावावे लागले.
- अनंत जोशी, गटनेते, शिवसेना
अनंत जोशी यांनी नगररचना विभागाला कुलूप ठोकल्याने त्यांचावर रितसर गुन्हा दाखल केला. दुपारी मनपा नगररचना विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना पाठविले होते. मात्र, दुपारी पोलीस जेवायला गेले असल्याने त्यांनी सायंकाळी बोलाविले होते. त्यामुळे सायंकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला.
-चंद्रकांत डांगे, आयुक्त

Web Title: Shiv Sena's group leader arrested and rescued by LPO in Jalgaon municipal corporation department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव