Shiv Sena agrees against BJP | भाजपविरोधात शिवसेना आक्रमक
भाजपविरोधात शिवसेना आक्रमक

मिलिंद कुलकर्णी
युती असूनही खान्देशात भाजपने शिवसेनेला कायम दुय्यम वागणूक दिल्याची तीव्र भावना शिवसैनिकांमध्ये आहे. महाशिवआघाडीच्या निमित्ताने आता सेना प्रभावशाली भूमिकेत येणार असल्याने पूर्वीच्या या मित्रपक्षांमध्ये तीव्र संघर्ष भविष्यकाळात होऊ शकतो. सेनेच्या मदतीला आता काँग्रेस आणि राष्टÑवादी असल्याने भाजप एकटा पडू शकतो. अर्थात भाजपचे नेते मुरब्बी आणि वाकबगार असल्याने ते ही परिस्थिती कशी हाताळतात, यावर पुढील सत्ताकारण अवलंबून राहणार आहे. अर्थात दोन्ही कॉंग्रेसशी काही मतदारसंघात सेनेचे खटके उडणे स्वाभाविक आहे.
राज्याचे सत्तासमीकरण बदलू लागल्याने त्याचा परिणाम प्रादेशिक पातळीवर निश्चित जाणवणार आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची अनेक वर्षांची युती असली तरी अंतर्विरोध खूप मोठा होता. काँग्रेस-राष्टÑवादीपेक्षा सेनेला शत्रू मानून भाजपने काही वेळा कोंडी केल्याची उदाहरणे आहेत. जळगाव जिल्हा परिषदेत हे दोन्ही पक्ष परस्परांविरुध्द लढत असत. मात्र सत्ता स्थापन करताना एकत्र येत असत. पण या निवडणुकीत तसे घडले नाही. काँग्रेसच्या सदस्यांची मदत घेऊन भाजपने सेनेला सत्तेत वाटा देण्यास नकार दिला. जिल्हा बँक आणि जिल्हा दूध संघात भाजपने सेनेच्या इतर लोकप्रतिनिधींना पॅनलमध्ये घेतले, पण उपनेते गुलाबराव पाटील यांना सोयीस्करपणे वगळले, ही सापत्न वागणूक पाटील विसरले असतील, असे कसे म्हणता येईल. पाचोऱ्यातील शिवसैनिकांना गेल्या दिवाळीत पोलीस कोठडीत पाठविण्याची कार्यवाही भाजपच्या सूचनेवरुन झाल्याची भावना अजूनही सैनिकांच्या मनात घर करुन आहे. जळगाव महापालिका निवडणुकीत ऐनवेळी सेनेचे मातब्बर नगरसेवक भाजपने फोडून पालिकेची सत्ता हस्तगत केली, याचा सल सैनिकांना बोचत आहे.
आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेच्या सहा उमेदवारांच्या विरोधात भाजपने बंडखोर उभे केले होते. गुलाबराव पाटील यांनी पंतप्रधानांच्या सभेपूर्वी व्यक्त केलेली नाराजी चर्चेचा विषय ठरली होती. संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी गिरीश महाजन यांना लेखी पत्र देऊन बंडखोरांवर कारवाईची मागणी केली होती, पण त्या पत्राची दखल देखील महाजन आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतली नव्हती, याचा राग सेनेत आहेच.
त्यामुळे भाजपविषयी नरमाईची भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी आता आक्रमक झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
जिल्हा परिषद, जळगाव महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभांमध्ये बदललेल्या सत्तासमीकरणाचे पडसाद उमटले. भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या अडचणीत त्यामुळे वाढ होणार आहे.
धुळे आणि नंदुरबारमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तेथे महाशिवआघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र येतात काय हे बघायला हवे. अर्थात धुळ्यात सेनेचे बळ कमी असले तरी नंदुरबारमध्ये चंद्रकांत रघुवंशी यांच्यामुळे सेना मजबूत झाली आहे. आता रघुवंशी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या नेत्यांशी कसा समन्वय राखतात, हे पहाणे औत्सुक्याचे राहणार आहे. तिथे राष्टÑवादीचे अस्तित्व नगण्य आहे.मात्र भाजपविरुध्द सगळे असा सामना झाला तर कसोटी भाजपची राहणार आहे, हे मात्र निश्चित आहे.
मोदीलाटेच्या प्रभावामुळे २०१४ मध्ये दोन्ही काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये आले. काही लोकप्रतिनिधी बनले. मात्र त्यांना भाजपमध्ये सन्मानाची वागणूक फारशी मिळाली नाही. परकेपण कायम राहिले. असंतोष असला तरी तो जाहीरपणे उघड होत नव्हता. आता दिल्लीत भाजप असला तरी मुंबईत नसला तर या नेत्यांना मोठा फरक पडेल. अशावेळी ‘घरवापसी’चे वेध लागू शकतात. सत्तेसाठीच हे सारे घडले असल्याने पुनरावृत्ती झाली तरी त्याचे ना नेत्यांना ना मतदारांना वेगळे वाटणार नाही.

Web Title: Shiv Sena agrees against BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.