गेल्या काही महिन्यांत हुंडाबळीच्या अनेक घटना कानावर येत असतानाच आता जळगावच्या सुंदर मोती नगर भागातून देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नुकतंच लग्न करून, भावी आयुष्याची आणि सुखी संसाराची अनेक स्वप्ने डोळ्यांत घेऊन जळगावची मयुरी ठोसर सासरी आली. पण, अवघ्या ४ महिन्यांतच तिने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मयुरी ठोसर असं या मृत नवविहितेचं नाव असून, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. मात्र, या चार महिन्यांच्या संसारात मयुरीच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. सगळं काही सुरळीत होईल, अशी आशा असतानाच बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.
मयुरीची मोठी बहीण नेहा ठोसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरीचा सासरच्या मंडळींकडून सतत छळ होत होता. विशेषतः तिचा पती गौरव ठोसर हा तिला शिवीगाळ करायचा आणि पैशांसाठी तिचा मानसिक छळ करत होता. या त्रासामुळे मयुरी नेहमी तणावाखाली राहत होती.
नेहा यांनी सांगितलं की, बुधवारी दुपारी मयुरीने त्यांना फोन केला होता आणि त्यावेळी ती आनंदी असल्याचं वाटलं होतं. मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी तिच्या वडिलांना मयुरीच्या सासरहून फोन आला आणि "तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे," असं फोनवर कळवण्यात आलं. या घटनेने तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
नेहा यांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर मयुरीला सासरच्या मंडळींकडून त्रास सुरू झाला होता. या दरम्यान गोष्टी सुरळीत व्हाव्यात म्हणून बुलढाणा येथे तीन वेळा बैठका झाल्या होत्या. प्रत्येक बैठकीत सासरच्या लोकांनी मयुरीला चांगले वागवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, या आश्वासनानंतरही तिचा छळ सुरूच राहिला, आणि शेवटी तिच्या सासरच्या लोकांनीच तिचा घात केल्याचा आरोप नेहा यांनी केला आहे. मयुरीचा पती गौरव ठोसर आणि सासरच्या मंडळींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे.