सात महिन्यात ८१ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:12+5:302021-09-07T04:21:12+5:30

जळगाव : कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाचा लहरीपणा या साऱ्याला कंटाळून सात महिन्यात तब्बल ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला ...

In seven months, 81 farmers died | सात महिन्यात ८१ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

सात महिन्यात ८१ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

जळगाव : कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाचा लहरीपणा या साऱ्याला कंटाळून सात महिन्यात तब्बल ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आत्महत्येनंतर वारसांनी दाखल केलेल्या मदतीसाठीचे ११ प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले आहेत, तर ३५ प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने मृत्यूनंतरही वारसांची वणवण कायम आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे महिन्यात असलेल्या निर्बंध काळातही १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

निसर्गाची अवकृपा, महागडे बियाणे पेरणी करून न उगवलेले पीक, दुबार पेरणी या सर्व प्रकारात शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठा फटका बसला. त्यानंतर रब्बी हंगामातही दर महिन्याला अवकाळी पाऊस झाल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. खासगी सावकार व सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत बळीराजा पडला. यामुळे खचलेल्या ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.

११ शेतकऱ्यांच्या वारसाची मृत्यूनंतरही वणवण

शासनाने शेतकरी आत्महत्येनंतर वारसांना मदतीची घोषणा केली आहे. यासाठी जिल्हास्तरीय समिती असून, या समितीकडे आलेल्या ८१ मदतीच्या प्रस्तावांतून या समितीने ११ प्रस्ताव अपात्र ठरविले आहेत. त्यामुळे मृत्यूनंतरही या शेतकऱ्यांच्या वारसांची शासनाकडून उपेक्षा कायम आहे.

१०० टक्क्यांहून अधिक पाऊस होऊनही वाढल्या आत्महत्या

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. २०१९ व २०२० या वर्षात पावसाने सरासरी ओलांडली. मात्र, याच पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. यामध्ये २०१९मध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला कमी पाऊस व पिके काढणीच्या वेेळी अतिवृष्टी अशा स्थितीमुळे हंगाम हातचा गेला. यामुळे २०१९ या वर्षीच गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आत्महत्या वाढून ही संख्या १९६वर पोहोचली.

आठ वर्षात १,२६३ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

गेल्या आठ वर्षांपासूनची शेतकरी आत्महत्येची स्थिती पाहता २०१३नंतर ही संख्या वाढतच गेली आहे. २०१३मध्ये तब्बल ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. २०१४मध्ये त्यात वाढ होऊन हा आकडा १७४पर्यंत पोहोचला व २०१५मध्ये त्यात आणखी वाढ होऊन ही संख्या १९०वर पोहोचली. यावर्षी जानेवारी ते जुलै २०२१ या सात महिन्यात ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मन हेलावणारी आठ वर्षातील संख्या

वर्ष-शेतकरी आत्महत्या

२०१३-९२

२०१४-१७४

२०१५-१९०

२०१६-१७१

२०१७-१५१

२०१८-१४८

२०१९-१९६

२०२० - १४१

२०२१ - ८१ (जुलैअखेर)

Web Title: In seven months, 81 farmers died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.