सात ते आठ लाखांचा कडबा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 15:42 IST2019-04-04T15:41:25+5:302019-04-04T15:42:30+5:30
दादरच्या कडब्याची गंजी पेटली

सात ते आठ लाखांचा कडबा जळून खाक
वरखेडी ता.पाचोरा :- लोहारी येथील बैलांचे व्यापारी हाजी सैद अ.करीम यांच्या कडब्याच्या गंजीला गुरुवार रोजी दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागून सात ते आठ लाख रुपयांचा दादरचा कडबा जळून खाक झाला.
पाचोरा वरखेडी रोडवर असलेल्या लोहारी गावी हमरस्त्याला लागून हाजी सैद अ.करीम यांचे निवासस्थान आहे. निवासस्थानाच्या समोरच हमरस्ता ओलांडून त्यांचे गुरांचे व चाऱ्याचे शेड आहे.शेडच्या बाहेर असलेल्या कडब्याच्या गंजीतुन दुपारी धूर निघत असलेला काही लोकांना दिसून आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता आगीने तोपर्यंत उग्ररूप धारण केले व बघता बघता संपूर्ण चारा जळून खाक झाला. हाजी सैद हे बैलांचे व्यापारी असून त्यांच्याकडे आठ ते दहा म्हैशी तसेच ५० ते ६० बैल नेहमी असतात.येत्या उन्हाळ्यात चारा टंचाईला तोंड देण्यासाठी त्यांनी नुकताच साडेसहा हजार रुपये शेकड्याच्या दराने दादरचा कडबा जवळजवळ बारा हजार पेंडी विकत घेतला होता, असे त्यांनी सांगितले. घटनास्थळी पाचोरा नगरपरिषदेचा अग्नीबंब दिड वाजेच्या सुमारास दाखल झाला. त्यांनी मोठ्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. त्यानंतर भडगाव येथिल अग्निशमन बंब देखील या ठिकाणी दाखल झाला. तसेच भोकरी येथील अकिल अहमद काकर यांनी आपले खासगी पाण्याचे टँकर तसेच सुभाष वामन पाटील लोहारी यांनी देखील आपले मालकीचे पाण्याच्या टँकरने आग विझवण्याकामी प्रयत्न केले. हाजी सैद है यावेळी वरखेडी येथील गुरांच्या बाजारात बैल विक्रीसाठी गेलेले होते.
धर्म भेद विसरुन अनेक धावले मदतीला
कोणावरही संकट आले तरी संकटाच्यावेळी जातीपातीचा विचार न करता सर्व एक दिलाने धावपळ करताना याठिकाणी दिसून आले. हिंदु तथा मुस्लिम बांधवांनी पेटता चारा वाचविण्याचा शर्थीचे प्रयत्न करून मोठ्या मुश्किलीने शंभर-सव्वाशे पेंडी चारा वाचविला. घटनास्थळी वरखेडी सजाचे तलाठी जे.एस.चिंचोले यांनी पंचनामा केला. तीव्र उन्हामुळे या कडब्याच्या गंजी ने पेट घेतला असावा असा कयास व्यक्त करण्यात येत होता.