ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत प्रशिक्षणाचा समाजाला निश्चित उपयोग होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:28+5:302021-08-19T04:21:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ज्येष्ठ नागरिकांचे उपक्रम राबविण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून सामाजिक ...

ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत प्रशिक्षणाचा समाजाला निश्चित उपयोग होईल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ज्येष्ठ नागरिकांचे उपक्रम राबविण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे प्रतिपादन प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने मंगळवार, १७ ते २१ ऑगस्ट या कालावधीत ‘ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत’ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन विद्यापीठाच्या अधिसभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. बी. व्ही. पवार बोलत होते. यावेळी प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांची ऑनलाईन अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती. तहसीलदार जितेंद्र कुंवर, विभागाचे प्रभारी संचालक प्रा. मनीष जोशी यांची मंचावर उपस्थिती होती.
लॉकडाऊनच्या काळात आजीवन अध्ययन व विस्तार विभागाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोलाचे काम केले. या नागरिकांच्या मदतीसाठी विद्यार्थी तयार व्हावेत म्हणून ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत प्रशिक्षण दिले जात असून, याचा समाजाला निश्चित उपयोग होईल, असे प्रा. पवार म्हणाले. तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन या योजना सहाय्यता दुतांमार्फत ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविकात प्रा. मनीष जोशी यांनी हे शिबिर आयोजनामागची भूमिका सांगताना या शिबिरात सहाय्यता दुताचे व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य, समुपदेशन अशा विविध पातळ्यांवर प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना अनेक पातळ्यांवर मदतीची गरज असते. ती या दुतांमार्फत पुरविण्याचा प्रयत्न राहील. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले. यावेळी विभागाच्या अहवाल पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. उद्घाटनानंतर प्रा. व्ही. व्ही. निफाडकर, धुळे, फेस्कॉम, जळगावचे अध्यक्ष डी. टी. चौधरी व प्रा. विवेक काटदरे यांनी मार्गदर्शन केले.