कठोरे खुर्द, बुद्रूक, अंजनसोडे, फुलगावची ‘जलजीवन मिशन’साठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:19 IST2021-08-13T04:19:58+5:302021-08-13T04:19:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : तालुक्यातील कंडारी, साकेगावनंतर आता फुलगाव, कठोरे बुद्रूक, कठोरे खुर्द, अंजनसोंडे ...

कठोरे खुर्द, बुद्रूक, अंजनसोडे, फुलगावची ‘जलजीवन मिशन’साठी निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : तालुक्यातील कंडारी, साकेगावनंतर आता फुलगाव, कठोरे बुद्रूक, कठोरे खुर्द, अंजनसोंडे व फुलगाव या चारही गावांची सामूहिक पाणीपुरवठा योजना ‘जलजीवन मिशन’साठी निवड झाली आहे. या गावांमध्ये आता प्रत्यक्ष कामाबाबत सर्वेक्षणही सुरू करण्यात आले असून, पाणीप्रश्न मिटणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून या गावांची निवड झाली आहे.
एमएसव्ही इंटरनॅशनल कंपनी दिल्ली येथील पथकाने प्रत्यक्षात चारही गावांना भेट दिली. तसेच आठ दिवस या गावांमध्येच राहून सॅटेलाइट यंत्रणेद्वारे सर्व्हे करण्यास सुरुवात करण्यात आली. गावातील ओडीएच्या योजनेला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. गावातील पाण्याची टाकी, पाइपलाइनही जीर्ण झाली होती. त्यामुळे या यंत्रणेद्वारे पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. या चारही गावांमध्ये यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. मात्र आता नवीन योजनेचा थेट सर्व्हे सुरू झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्वेक्षणाच्या वेळी आमदार सावकारे, प्रोजेक्ट मॅनेजर विपुल पराशर, आर. के. शर्मा व त्यांची सहकारी टीम, अभियंता चव्हाण, पंचायत समिती सभापती वंदना सदानंद उन्हाळे, माजी सभापती राजेंद्र चौधरी (फुलगाव), सरपंच वैशाली टाकळे, उपसरपंच व भाजप सरचिटणीस राजकुमार चौधरी, कठोरे खुर्दच्या सरपंच रोहिणी पाटील, कठोरा बुद्रूकच्या सरपंच दीपाली मोरे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष जितेंद्र कोळी, अंजनसोंडे येथील रामराव पाटील आदी उपस्थित होते.