चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगावातील बँकांना सुरक्षेबाबत सतर्कतेचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 13:51 IST2017-11-14T13:45:26+5:302017-11-14T13:51:23+5:30
आधीपासूनच काळजी घेतली जात असल्याचा दावा

चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगावातील बँकांना सुरक्षेबाबत सतर्कतेचे आदेश
जळगाव- नवी मुंबई येथील बँक आॅफ बडोदाच्या शाखेत भुयार खोदून त्याद्वारे प्रवेश मिळवून ३० लॉकर चोरट्यांनी फोडल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगावातील राष्टÑीयकृत व सहकारी बँकांच्या शाखांनाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तर काही बँकांकडून पूर्वीपासूनच काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.
खबरदारी घ्या, इमारतीची दुरुस्ती करून घ्या
युनियन बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयाकडून तसेच नाशिक विभागीय कार्यालयाकडून याबाबत सर्वच शाखांना काळजी घेण्याबाबतच्या सूचना ई-मेल द्वारे सूचना करण्यात आल्या आहेत. जळगाव शाखेलाही याबाबत ई-मेल प्राप्त झाला असल्याची माहिती मुख्य प्रबंधक अनिल पतंग्या यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यात इमारतीचे स्ट्रक्चर व्यवस्थित आहे ना? याची पाहणी करून काही दुरूस्ती आवश्यक असल्यास तातडीने दुरूस्ती करून घ्यावी. तसेच सतर्कता बाळगावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
नव्याने आदेश नाहीत
मुंबईतील घटनेच्या पार्श्वभूमीवर बँक आॅफ बडोदाच्या मुख्य शाखेकडून जळगाव शाखेला मंगळवारी दुपारपर्यंत सुरक्षेबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत कोणत्याही सुधारीत सूचना प्राप्त झालेल्या नव्हत्या. बँकेचे व्यवस्थापक एम.आर. बडगे यांनी सांगितले की, पूर्वीपासूनच सुरक्षेबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सीसीटीव्हीद्वारे बँकेच्या परिसरात लक्ष ठेवले जाते. तसेच सलग सुट्या आल्यास त्या दिवशी शहरातच असलेले अधिकारी शाखांमध्ये दिवसातून एक-दोन वेळा चक्कर मारून पाहणी करून घेतात. तसेच एटीएमच्या सुरक्षा रक्षकांनाही सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत.
सुरक्षेची पूर्ण काळजी
बँक आॅफ इंडिया मुख्य शाखेचे व्यवस्थापक मनोहर डांगे यांनी सांगितले की, त्यांच्याकडे लॉकर सुविधा नाही. मात्र तरीही सुरक्षेची पूर्ण काळजी आधीच घेण्यात आली आहे. मुख्य शाखा पहिल्या मजल्यावर असल्याने भुयार करण्यासारखा धोका नाही. मात्र तरीही अलार्म सिस्टीम बसविण्यात आली आहे. जर काही गडबड झालीच तर अलार्म वाजून त्याचा मेसेज पोलीस स्टेशनला, बँकेच्या व्यवस्थापकांना तसेच संबंधीत अधिकाºयाला लगेच जाईल. त्यामुळे अनुचित घटना टळू शकेल.