कापूस वेचणीमुळे शाळा ओस
By Admin | Updated: November 20, 2014 14:41 IST2014-11-20T13:36:17+5:302014-11-20T14:41:23+5:30
मजुरांची कमतरता व मजुरीचे चढते दर लक्षात घेता पाहुणे म्हणून आलेल्या मंडळींसह शाळकरी विद्यार्थी शेतात कापूस वेचणीसाठी जात असल्याचे चित्र दिसत आहे.

कापूस वेचणीमुळे शाळा ओस
शिरपूर : तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. असे असतानाही मजुरांची कमतरता व मजुरीचे चढते दर लक्षात घेता पाहुणे म्हणून आलेल्या मंडळींसह शाळकरी विद्यार्थी शेतात कापूस वेचणीसाठी जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे बहुतांश शाळा ओस पडल्याचे चित्र जाणवत आहे.
गेल्या महिन्यापासून सर्वत्र कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. तालुक्यात अतवृष्टीने यावर्षी मोठय़ा प्रमाणावर कापूस पिकाला फटका बसला आहे. तशातच कापसाचे उत्पन्न समाधानकारक नाही. या पिकावरच शेतकर्यांचे आर्थिक नियोजन असते. कापसाची कमी आवक लक्षात घेता मजुरी देणेही शेतकर्यांना परवडत नसल्याने माहेरी आलेल्या मुली शेतावर जाऊन कापूस वेचत आहेत. तसेच त्यांच्या समवेत त्यांची मुलेही त्यांना मदत करीत आहेत.
शाळेची पटसंख्या घटली
शिरपूर तालुक्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या १९ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १ हजारापर्यंत विद्यार्थी, तर ७३ माध्यमिक शाळेमधील पटसंख्या २२ हजारांपर्यंत एकंदरीत या शाळेतील ४0 ते ४५ टक्केच्यावर विद्यार्थी कापूस वेचणीला शेतात जाताना दिसत असल्यामुळे बहुतांश शाळेतील पटसंख्या कमी झालेली आहे.
दुपारनंतर अन्य विद्यार्थ्यांची दांडी
ग्रामीण भागातील शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी कापूस वेचणीला जात असल्यामुळे बोटावर मोजण्याएवढेच विद्यार्थी शाळेत येत आहे, तेही मधल्या सुट्टीनंतर गायब होत असल्याचे चित्र आहे.
कापूस वेचून प्रत्येक विद्यार्थी किमान १00 ते ३00 रुपयांपर्यंत मजुरी मिळवत आहे. मुलांना दिवाळीची सुटी लागल्यापासून ते कापूस वेचणीला जात आहे. पैसा मिळत असल्यामुळे त्यांनी शाळेला दांडी मारल्याचीही चर्चा आहे.
दिवाळीनंतर शाळा उघडूनसुद्धा मुले अद्यापही कापूस वेचणी करीत आहेत. साधारणत: डिसेंबर अखेरपर्यंत विद्यार्थ्यांची कापूस वेचणीमुळे शाळेला दांडी असेल, असेही सांगण्यात आले. त्यामुळे डिसेंबरनंतरच शाळा पुन्हा गर्दीने फुलणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.
------------
कधी नैसर्गिक आपत्ती, तर कधी शेतमालाला भाव नाही. अशा दुष्टचक्रात बळीराजा सापडला आहे. शेतकरी नगदी पीक म्हणून कापूस पिकाकडे पाहात होते. मात्र, आता कापूस लागवडीसाठी लागणारा खर्च, मजुरी पाहता मिळणारा भाव अत्यल्प असल्यामुळे शेतकर्यांना कापूस पीक परवडेनासे झाले आहे.