सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : ड्रग्जच्या साखळी कुठपर्यंत आणि त्यात कोणाकोणाचा सहभाग आहे, याची कुंडली काढण्यासाठी अटकेत असलेला सर्फराज भिस्ती याचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने त्याला शनिवारी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
शाहू नगरात शहर पोलिसांनी छापा टाकून साडेपाच लाख रुपये किंमत असलेले ५३ ग्रॅम मॅफेड्रॉल एमडी ड्रग्ज पकडले होते. यात सर्फराज भिस्ती याला अटक करण्यात आली होती. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. शनिवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपासधिकाऱ्यांनी शहरात विक्री होत असलेल्या ड्रग्जची साखळी जोडण्याठी तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती.
न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर संशयित सर्फराज भिस्ती याला दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.