सामाजिक जीवनावर साने गुरुजींचा प्रभाव पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:38+5:302021-09-05T04:20:38+5:30
सामाजिक जीवनावर साने गुरुजींचा प्रभाव प्रा.डॉ. ए.जी. सराफ: गुरुजींमुळे मी घडलो आणि अनेकांना घडवू शकलो संजय पाटील लोकमत ...

सामाजिक जीवनावर साने गुरुजींचा प्रभाव पडला
सामाजिक जीवनावर साने गुरुजींचा प्रभाव
प्रा.डॉ. ए.जी. सराफ: गुरुजींमुळे मी घडलो आणि अनेकांना घडवू शकलो
संजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांमुळे ज्ञानात भर पडली असली तरी सामाजिक जीवनात साने गुरुजींचा प्रभाव पडला असल्याने मुलांवर, निसर्गावर प्रेम करतो. मला घडवले तसे मी अनेक विद्यार्थीदेखील घडवले असल्याचे प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा साने गुरुजी स्मारक समितीचे डॉ. ए.जी. सराफ यांनी सांगितले.
कडक शिस्तीचे भोक्ते आणि पर्यावरणाची आवड असलेले प्राचार्य सराफ यांचे शालेय शिक्षण प्रताप हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण प्रताप महाविद्यालयात झाले. प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजींचे विद्यार्थी व नंतर सहकारी झालेले बी.जी. कुलकर्णी (मराठी), बा.ना. जठार (भूगोल), चंपा लिमये(संस्कृत, मराठी), जी.डी. गुर्जर(गणित),गो. रा. बुवा (इंग्रजी) यांच्यासारख्या मेहनती शिक्षकांमुळे सर्व विषयांची आवड होती.
महाविद्यालयात वाय.डी. नाडकर्णी, व.पा. नेने यांचे मार्गदर्शन लाभले. मात्र हे करत असताना सामाजिक जीवनात साने गुरुजींचा प्रभाव पडला आहे. राष्ट्रसेवादलात साने गुरुजींनी खेळ, गाणी आणि शिस्त शिकवली. त्यांनतर गुरुजी स्वातंत्र्य लढ्यात असताना ते माझ्या घराच्या शेजारी शिवाजी बगीच्याच्या बाजूला एक वर्ष काड्यांच्या झोपडीत अज्ञातवासात राहिले.
महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करताना सराफ यांच्या नावाचा दरारा होता. साफसफाई आणि कॉपी विरहित शिक्षण याबाबत प्रताप महाविद्यालयाचा महाराष्ट्रात नावलौकिक होता. त्यावेळी युजीसीची योजना आली होती की पीएच.डी. करणाऱ्याला दोन वर्षे पगारी रजा आणि १५०० रुपये महिना मानधन देण्याचे ठरले तेव्हा तत्कालीन चेअरमन भगवंतसिंग कालरा यांच्या सहकार्याने सर्वाधिक १३ प्राध्यापक पीएच.डी.साठी पाठवले. निसर्ग व पर्यावरणाची आवड असल्याने वृक्षारोपण व त्याचे महत्त्व पटवून दिले. हरित चळवळ आजही सुरूच आहे. शालेय शिक्षणातील शिक्षक आणि सामाजिक जीवनात साने गुरुजी यांच्या अनमोल मार्गदर्शनानेच एक वेगळा ठसा उमटवला अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचेदेखील समाधान गुरुमुळेच मिळाले आहे. म्हणूनच अष्टपैलू विद्यार्थी निर्माण होण्यासाठी साने गुरुजींचे स्मारक उभे राहण्यासाठी वयाच्या ८४ व्या वर्षीदेखील धडपड सुरू असल्याचेही प्राचार्य सराफ यांनी सांगितले.