महसूलच्याच पथकाने सोडले वाळूचे वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:41 IST2020-12-04T04:41:48+5:302020-12-04T04:41:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - एकीकडे गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने गिरणा पात्रात बंदोबस्त ...

महसूलच्याच पथकाने सोडले वाळूचे वाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - एकीकडे गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने गिरणा पात्रात बंदोबस्त वाढविला असताना, दुसरीकडे गश्तीसाठी तैनात करणाºयाच महसुल कर्मचाऱ्यांनी आव्हाणे शिवारातील वाळूचे वाहन सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी सोशल मीडियावर एक मोबाईलचा आॅडीओ व्हायरल केला असून, यामध्ये संबधित तलाठी आपण नवीन असल्याने हे वाहन सोडावे लागले असल्याचा खुलासा केल्याचे स्पष्ट होत आहे.
वाळू उपसा रोखण्यासाठी गिरणा पात्रालगतच्या प्रत्येक गावातून विरोध सुरु आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून वाळू उपसा रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, महसूलच्याच कर्मचाऱ्यांकडून वाळू वाहतूक करणाºया वाहनांना सोडून दिले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याआधीही अनेक प्रकरणात महसूल व पोलीस प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांची वाळू माफियांसोबत मिलीभगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता दीपककुमार गुप्ता यांनी व्हायरल केलेल्या मोबाईल कॉलवरून पुन्हा एकवेळेस सिध्द होत आहे.
नवीन असल्याने वाहन सोडून दिल्याचे तलाठ्याने केले मान्य
दीपककुमार गुप्ता यांनी व्हायरल केलेल्या आॅडीओ मध्ये गुप्ता यांनी आव्हाणे परिसरातील एका तलाठ्याला मंगळवारी रात्री महसुल व पोलीसांच्या पथकाने सोडून दिलेल्या एका वाळूच्या वाहनाबाबत विचारणा केली. त्यात संबधित तलाठी गुप्ता यांना प्रत्यक्ष भेटण्याची मागणी करत आहेत. तसेच वाहन पकडले होते याबाबत देखील मान्य करत असून, आपण नवीन असल्याने हे प्रकरण आपल्याला समजले नसल्याचे सांगत आहे. मात्र, एकूण संभाषणावरून महसुलच्या पथकाने वाळूचे वाहन सोडून दिल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार एम.एच.१९ सीवाय १४७४ या क्रमांकाचे वाहन पकडले होते. तसेच महसुलच्या पथकात काही पोलीसांचाही समावेश असल्याचेही या आॅडीओतील संभाषणावरून स्पष्ट होत आहे.
आव्हाणे शिवारातील वाळूच्या साठ्यांवर कारवाई का थांबली ?
आव्हाणे परिसरात महसुल व पोलीसांचे पथक सातत्याने पाहणी करत आहे. मात्र, रस्त्यालगत वाळू माफियांनी केलेल्या वाळू च्या साठ्यांवर महसुलच्या पथकाकडून अद्यापही कारवाई होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी महसुल कर्मचाऱ्यांची चेक पोस्ट आहे. त्याच ठिकाणीही दोन साठे आहेत. मात्र, हा साठा जप्त करण्यात येत नसल्याने ट्रॅक्टरव्दारे उपसा सुरु असल्याचेही दिसून येत आहे. यासह महसूलच्याच कर्मचाºयांचा परवानगीने रात्री चार ते पाच ट्रॅक्टर चालकांना नदीतून उपसा करण्याची परवानगी दिली जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.