तीन ट्रॅक्टर जप्त
भडगाव : तालुक्यातील शिंदी येथे १ तर वलवाडी रस्त्यावर २ ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळून आले. हे तिन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती भडगावचे निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर यांनी दिली.
महसूल विभागाच्या पथकाला गिरणा पात्रातून अवैधरित्या वाळू चोरी होत असल्याचा सुगावा लागला. १ ट्रॅक्टर शिंदी गावाजवळील पाटचारी रस्त्यावर पकडले. या पथकात कोळगावचे मंडळ अधिकारी एन. जी. बागड, शिंदीचे तलाठी एस. के. पारधी यांचा समावेश होता तसेच वलवाडी गावाजवळील रस्त्यावरही २ ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळून आले. या पथकात तहसीलदार सागर ढवळे, भडगावचे मंडल अधिकारी विजय येवले, आमडदे मंडळ अधिकारी दिलीप राजपूत यांचा समावेश होता. हे तिन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. ट्रॅक्टरमालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
१ एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत भडगाव महसूल प्रशासनाने २८ वाहनांवर दंडात्मक वसुलीची कार्यवाही केलेली आहे. ८ लाख ६१ हजार ३२९ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.