धरणगाव ‘तहसील’मधून जप्त वाळूचे ट्रॅक्टर पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 15:29 IST2018-10-03T15:27:32+5:302018-10-03T15:29:32+5:30
तहसील कार्यालयात पाच दिवसापूर्वी जप्त केलेले अवैध वाळूचे ट्रॅक्टर संबधित मालकाने पळवून नेल्याने मालकासह चालकाविरूद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला तहसीलदार सी.आर.राजपूत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव ‘तहसील’मधून जप्त वाळूचे ट्रॅक्टर पळविले
धरणगाव : तहसील कार्यालयात पाच दिवसापूर्वी जप्त केलेले अवैध वाळूचे ट्रॅक्टर संबधित मालकाने पळवून नेल्याने मालकासह चालकाविरूद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला तहसीलदार सी.आर.राजपूत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तहसीलदारांनी २७ सप्टेंबर रोजी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्र.एमएच २० एएम ४९९३ हे पकडून दंड वसूलीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात लावले होते. सदर ट्रॅक्टर पाच दिवस तहसील आवारात कारवाई साठी लावले होते.
मात्र हे ट्रॅक्टर २ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपूर्वी संबधित मालकाने चोरीची वाळूसह दंड न भरता गायब केल्याची बाब उघड झाली. त्यानंतर महसूल पथकाने नेमके ट्रॅक्टर कुणी गायब केले याबाबत चौकशी सुरु केली. त्यावेळी हे ट्रॅक्टर संबधित मालकाने गायब केल्याची बाब समोर आली. त्यानंतर तहसीलदार सी.आर.राजपूत यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला येत फिर्याद दिली. त्यानुसार मालक सुदाम सोनवणे (रा.बांभोरी प्र.चा.ता.धरणगाव) व चालक या दोघांविरुध्द ३ लाख किंमतीचे ट्रॅक्टर, एक लाख किंमतीचे ट्रॉली, तसेच पाच हजार रुपये किंमतीची चोरीची वाळू दंड न भरता चोरुन (पळवून) नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पो.निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जोशी हे करीत आहे. अवैध वाळू वाहतुकदाराची मुजोरी हा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.