विजयकुमार सैतवाल
जळगाव : स्वस्त धान्य दुकानावरून वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थ्यांना अल्पदरात मिळणारे धान्य अनेकांकडून ते वाढीव भाव देऊन खरेदी केले जात आहे. यासाठी अनेकजण दर महिन्याला लाभार्थ्यांच्या घरी जाऊन धान्य गोळा करतात व बाहेर आणखी ते जास्त दराने विक्री करतात. अनेकांचा हा व्यवसायच होऊन गेला असून जिल्हाभरात असे चित्र आहे.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंब तसेच गरजूंना आधार मिळावा म्हणून सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब योजना अशा वेगवेगळ्या योजनेत दोन रुपये प्रतिकिलोने गहू तर ३ रुपये प्रति किलोने तांदूळ दिले जातात. इतकेच नव्हे कोरोनाच्या काळात रोजगार गेल्याने गरजूंना आधार मिळावा म्हणून गेल्यावर्षी व यंदाही मोफत धान्यदेखील देण्यात आले. मात्र, मिळणारे धान्य एका महिन्यात संपत नाही. त्यामुळे एवढे धान्य काय करावे, असाही प्रश्न असतो. त्यामुळे हे धान्य जास्त दरात विक्री केले जाते. यासाठी आता गावा-गावांमध्ये लाभार्थ्यांचे घर महिती असल्याने त्यांच्याकडे जाऊन ते धान्य खरेदी केले जाते.
१० रुपयांच्या पुढे मिळतो भाव
स्वस्त धान्य दुकानावरून धान्य मिळाल्यानंतर ते बाहेर जास्त दरात खरेदी होते. यासाठी प्रत्येक गावात वेगवेगळे दर मिळतात. हे सर्व दर १० रुपयांच्या पुढे आहे.
हे घ्या पुरावे
अमळनेर : अमळनेर तालुक्यात तर काही दुकानदारच हे धान्य खरेदी करतात, अशी माहिती मिळाली. या तालुक्यात गहू १४ रुपये प्रतिकिलोने तर तांदूळ १३ रुपये प्रतिकिलोने खरेदी केले जातात.
जळगाव : जळगाव तालुक्यातही अशीच स्थिती आहे. लाभार्थ्यांना मिळणारे धान्य मध्यमवर्गीय मंडळी खरेदी करत असतात. गहू १२ रुपये तर तांदूळ १५ रुपये प्रतिकिलोने खरेदी केले जातात.
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यात तर सायकलवर घरोघरी फिरून धान्य खरेदी करणारी मंडळी आहे. भंगार विक्री करणारी मंडळी ज्याप्रमाणे सायकल घेऊन फिरतात, त्याप्रमाणे ही मंडळी सायकल घेऊन धान्य घेतात तेथे तांदूळ १० ते १२ रुपये तर गहू ९ ते १२ रुपये प्रति किलोने खरेदी केले जातात.